नांदेड (प्रतिनिधी )- सन 2007 मध्ये पोलीस अधीक्षक पदावर असताना ज्या महिला आणि पुरुषांना पोलीस दलात भरती करून घेतले होते, त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी सध्या नागपूर शहराचे पोलीस आयुक्त असलेल्या डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान आणि वृक्ष वाटप या उपक्रमाचे आयोजन केले.
हनुमान पेठ, वजीराबाद (नांदेड) येथे स्वामी समर्थ ब्लड ग्रुप, निसर्ग सेवा ग्रुप पानभोसी, तालुका कंधार, आणि नांदेड पोलीस मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व वृक्षवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.
शिबिरात 51 जातींच्या एकूण 1000 झाडांचे वाटप वृक्षप्रेमींना करण्यात आले. यामध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत झाडांचे संगोपन करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.
या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सन 2007 बॅचचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पुढाकार घेतला. त्यामध्ये पोलीस अंमलदार दत्ता गायकवाड, प्रकाश मामुलवार, अनिल मुपडे, अरविंद पाटील, मारुती चव्हाण, स्वाधीन ढवळे, शेख कदीर, आळंदीकर, दुधाडे यांचा विशेष सहभाग होता.
डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी 2007 ते 2008 या कालखंडात नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना, अनेक तरुणांना पोलीस सेवेत दाखल होण्याची संधी त्यांच्या गुणवत्तेवर दिली होती. आज त्याच कर्मचाऱ्यांनी आपल्या गुरुवर्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करत कर्तृत्व व कृतज्ञतेचे अनोखे उदाहरण समाजापुढे ठेवले.
