उद्या ‘स्वारातीम’ विद्यापीठाचा २८ वा दीक्षान्त समारंभ ;राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  ना.चंद्रकांत  पाटील यांची विशेष उपस्थित

नांदेड–स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २८वा दीक्षान्त समारंभ आज शनिवार, दि.२० सप्टेंबर, रोजी सकाळी ११:०० वा. विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या समारंभास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. चंद्रकांत दादा पाटील हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून अवंतिका विद्यापीठ उज्जैनचे कुलपती तथा आय.आय.टी., कानपुरचे माजी संचालक पद्मश्री डॉ. संजय गोविंद धांडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, व्यवस्थापन परिषदचे सर्व सदस्य यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी दिली.

याप्रसंगी विद्यापीठातून सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड चान्सलर सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी हा बहुमान परभणी येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम कॉलेज ऑफ एज्युकेशनची विद्यार्थींनी सयदा तयबा एसडी. एम.डी. मझहर हस्मी यांना मिळणार आहे. याशिवाय इतरही ५२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

अठ्ठावीसाव्या दीक्षान्त समारंभानिमित्त विद्यापीठ परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या एकूण १९,४०० विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासामारंभात प्रत्यक्ष विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या ३१९ , वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेच्या १०८ मानव्य विज्ञान विद्याशाखेच्या ६१ आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास मंडळ विद्याशाखेच्या ६२ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप मान्यवराच्या हस्ते होणार आहे. या समारंभात ७० विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

हा दीक्षान्त समारंभ यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक समिती आप-आपली कार्य जबाबदारीपूर्वक पूर्ण करीत परिश्रम घेत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!