नांदेड (प्रतिनिधी)-केंद्र सरकारने जीएसटीमध्ये केलेले बदल हे क्रांतीकारी बदल आहेत. तसेच या बदलामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे खासदार अशोक चव्हाण यांनी केले.
आज बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत खासदार अशोक चव्हाण बोलत होते. त्यांच्या सोबत नांदेड दक्षिण प्रमुख संतुक हंबर्डे, अमर राजूरकर, किशोर देशमुख, गोविंद नागेलीकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त जीएसटीमधील बदलाचा हा निर्णय झालेला आहे जो २२ सप्टेंबर २०२५ अंमलात सुध्दा येणार आहे. प्रत्येक राज्याचा जीएसटीमध्ये हिसा असतो. त्यामुळे राज्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुध्दा मोठा आमुलाग्र बदल होणार आहे. ज्या ९९ टक्के वस्तूंवर एकूण ९२ टक्के जीएसटी वसुल होत होता. तो आता दोन स्तरांमध्ये कमी करण्यात आला आहे. पाच आणि बारा टक्केच जीएसटी लागणार आहे. दिवाळी आणि दसरा या शुभ मुहूर्तावर १४० कोटी जनतेतील गरीब व मध्यमवर्गीयांच्या खर्चात बचत होणार आहे असा दिवाळी धमाका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जन्मदिवसाच्या शुभ मुहूर्तावर त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो.
जीएसटी कौन्सिलने सर्व राज्यांच्या समन्वय साधून घेतलेल्या या निर्णयात काही वस्तूंवर जीएसटी शून्य करण्यात आला आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या आर्थिक वर्षात २२ लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला होता. ती वाढ २६० टक्के होती. काही दुग्धजन्य पदार्थांना जीएसटी मुक्त करण्यात आले आहे. किराणा साहित्यावर जीएसटी बारा टक्क्यावरुन पाच टक्के करण्यात आला आहे. काही दैनंदिन वस्तू ज्या १८ टक्के होत्या त्या पाच टक्के जीएसटीवर आल्या आहेत. स्वयंपाक घरातील अनेक वस्तूंवर जीएसटी बारा टक्केच्या तुलनेत आता पाच टक्के झाला आहे. शेती उपयोगी वस्तूवर आता पाच टक्के जीएसटी आहे. बियाणे आणि खते १८ टक्केवरुन पाच टक्के करण्यात आला आहे. वैयक्तीक आरोग्य विमा, जीवन विमा जीएसटी मुक्त करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या वह्या आणि पेन्सिल शून्य टक्केवर आहेत. हे निर्णय देशाच्या विकासाला चालना देणारे आहेत. पायाभूत सुविधांसाठी वापरला जाणारे इंधन कोळसा पाच टक्के जीएसटीमध्ये आहे. मेकींग इंडिया या योजनेव्दारे देशात तयार होणार्या संरक्षण साहित्यावर सुध्दा जीएसटी कमी करण्यात आला आहे. या सर्वामुळे बचत होणारा पैसा पुन्हा बाजारात येईल, खरेदी वाढेल, उत्पादन वाढेल म्हणजे रोजगार निर्मिती होईल, अशा सुंदर शब्दात अशोक चव्हाण यांनी जीएसटीची प्रशंसा केली. केंद्र सरकारने जीएसटीमध्ये ४० टक्केचा एक स्तर ठेवला आहे. याबद्दल अशोक चव्हाण यांनी काही सांगितले नाही, यासंदर्भाने त्यांना प्रश्न विचारला तेंव्हा त्यांनी सांगितले की, तो ४० टक्केचा स्तर श्रीमंत खरेदी करतात त्या वस्तूंवर आहे.
अत्यंत उत्कृष्ट शब्दात भाजप खा.अशोक चव्हाण यांनी जीसीएसटीच्या कमी झालेल्या दरांची प्रशंसा केली
