नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या निरोप समारंभात तेरे जैसा यार कहा हे फिल्मी गाणे आपल्याच अधिकाराच्या खुर्चीवर बसून म्हणणाऱ्या तहसीलदाराचे निलंबन महसुल व वन विभागाने रद्द केले आहे आणि त्यांना रेणापुर येथे योग्य काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्याचे तहसीलदार प्रशांत विश्र्वासराव थोरात यांची बदली रेणापूर जि.लातूर येथे झाली होती. त्यानिमित्त तहसील कार्यालय उमरी येथे 8 ऑगस्ट 2025 रोजी त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या निरोप समारंभात त्यांनी तहसीलदार पदाच्या खुर्चीवर बसूनच तेरे जैसा यार कहा हे फिल्मी गाणे म्हटले होते. त्या फिल्मी गाण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि सर्वसामान्य नागरीक व राजकीय पक्षांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यामुळे त्यांना 16 ऑगस्ट रोजी सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
तहसीलदार प्रशांत थोरात यांनी 20 ऑगस्ट रोजी निलंबन रद्द करण्याची विनंती शासनाकडे केली होती. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील यात असलेल्या अधिकाऱ्यांना अनुसरून महसुल व वन विभागाचे अवर सचिव प्रविण पाटील यांनी प्रशांत थोरात यांचे 16 ऑगस्ट 2025 रोजीचे निलंबन आदेश रद्द केले आहे. तसेच त्यांना तहसीलदार रेणापुर जि.लातूर येथे पुर्ववत करण्यात आले आहे आणि कार्यालयीन काम करतांना आवश्यक ती खबरदारी घेण्याची सुचना पण करण्यात आली आहे.
तेरे जैसा यार कहा.. म्हणणारे तहसीलदार थोरात निलंबनातून मुक्त
