*जिल्हाधिकाऱ्यांनी निर्माण केले 104 वर्षीय आजीबाईंचे आयुष्यमान कार्ड*

नांदेड :- नांदेड जिल्ह्यात सध्या आयुष्यमान कार्ड निर्मिती मोहिम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत नुकतेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी केली. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः आयुष्यमान कार्ड तयार करून नागरिकांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला. यावेळी त्यांनी गरजू व आजारी लाभार्थ्यांना मोफत उपचाराचा लाभ मिळावा, अशी भावना व्यक्त केली. यावेळी प्रशिक्षणार्थी अधिकारी अनन्या रेड्डी उपस्थित होत्या.
जिल्ह्यात एकूण 27 लाख 38 हजार लाभार्थी असून, त्यापैकी 10 लाख 38 हजार नागरिकांना कार्ड वितरित झाले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनी देखील तात्काळ आपले कार्ड करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नुकतेच वजीराबाद भागातील कस्तुराबाई शर्मा या 104 वर्षीय आजीबाईंचे ‘आयुष्यमान वय वंदना’ कार्ड तयार करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आयुष्यमान कार्ड स्वत: तयार केले हा क्षण पाहून उपस्थित नागरिकांच्या गहिवरुन आले. आजीबाईंनी जिल्हाधिकाऱ्यांना आशीर्वाद देऊन आभार मानले.
या योजनेत पात्र लाभार्थ्यांना शासकीय मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची सुविधा आहे. विशेष म्हणजे गंभीर आजारांवर 34 विशेष श्रेणींमध्ये 1 हजार 356 शस्त्रक्रिया व उपचारांचा समावेश असून, सांधे प्रत्यारोपण, लहान मुलांचे कर्करोग उपचार, मानसिक आजारांवरील उपचार यांचा देखील समावेश आहे.
“हा फक्त शासकीय उपक्रम नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. समाजसेवक, विद्यार्थी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या परिसरातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याचे कार्ड तयार करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा.”असेही आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांचा हा प्रत्यक्ष सहभाग व कर्तव्यदक्षता पाहून इतर अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळाली. या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी बारदेवाड, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे जिल्हा समन्वयक डॉ. दिपेशकुमार शर्मा, आरोग्यमित्र नवदीप जाधव, अक्षय बुरसे, मोहम्मद इब्राहीम, गजानन कोमटवार तसेच परिसरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.
