ऑनर किलींग करणारा आजोबा,वडील आणि काका पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या मुलीचा आणि तिचा प्रियकराचा खून करणाऱ्या आजोबा, वडील आणि काका या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठविले आहे.
बालाजी विठ्ठल भंडारे रा.बोरजुन्नी ता.उमरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा भाऊ लखन बालाजी भंडारे आणि त्याची प्रेयसी संजीवनी सुदेश कमळे यांचा खून संजीवनीचे आजोबा लक्ष्मण पिराजी सुरणे, वडील मारोती लक्ष्मण सुरणे आणि काका माधव लक्ष्मण सुरणे या तिघांनी केला आहे. ही घटना 25 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2 ते 3 वाजेदरम्यान गोळेगाव ते बोरजुन्नी या पाऊल वाटेवर करकाळा शिवारात घडली. दोघांना मारहाण करून, दोघांना बांधून त्यांना विलास बापुराव कदम यांच्या शेतातील विहिरीत फेकुन दिले.
एक वर्षापुर्वी संजीवनीचे लग्न सुदेश सोबत झाले होते. परंतू तिचा प्रियकर लखन भंडारे सोबत संबंध कायम होते. 24 ऑगस्ट रोजी आपल्या सासरवाडीत कोणी नाही हे पाहून संजीवनीने लखन भंडारेला गोळेगावला बोलावले. परंतू दुर्देवाने तिचा नवरा अचानकच परत आला आणि त्याला नाही ते पाहावे लागले. त्यानंतर संजीवनीच्या वडीलांना बोलावण्यात आले. तिला आणि तिच्या प्रियकराला सोबत घेवून जातांना त्यांचा खून करण्यात आला.
याप्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार संजीवनीचे आजोबा लक्ष्मण पिराजी सुरणे, वडील मारोती लक्ष्मण सुरणे आणि काका माधव लक्ष्मण सुरणे यांना अटक झाली. सहाय्यक पोलीस निरिक्षक अंकुश माने यांनी या तिघांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने या तिघांना 4  दिवस अर्थात 30 ऑगस्ट 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…

प्रेमाच्या किंमतीवर ऑनर किलिंग – मुलगी आणि प्रियकराला विहिरीत फेकले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!