नायगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा निर्णय
नांदेड(प्रतिनिधी)-एका विवाहितेचा नवरा अपघातात मरण पावल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी तुझ्याचमुळे आमचा मुलगा मरण पावला असा आरोप तिच्यावर केल्यानंतर त्या महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी जवळपास 16 महिन्यानंतर नायगाव न्यायालयाने त्या महिलेच्या प्रकरणात न्याय दिला असून महिलेच्या सासु, सासरा, भाया आणि दिराविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश नायगाव पोलीसांना दिले आहेत.
रामकिशन माधवअप्पा हिंगणकर यांनी नायगाव न्यायालयात दाखल केलेल्या किरकोळ फौजदारी अर्ज क्रमांक 46/2024 प्रमाणे त्यांची मुलगी स्नेहा हिचे पती अरविंद भाऊराव बेंद्रीकर हे 6 एप्रिल 2024 रोजी नांदेड येथून आपली नोकरी संपवून बेंद्री ता.नायगाव या गावाकडे दुचाकीवर जात असतांना अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी अर्थात रामकिशन हिंगणकर यांची मुलगी स्नेहा हिला नांदेडच्या रुग्णालयात घेवून आले होते. परंतू स्नेहा यांचे पती अरविंद यांचा मृत्यू झाला होता. घरी जातांना आणि घरी गेल्यावर स्नेहाचा सासरा डॉ.भाऊराव बाबुराव बेंद्रीकर, सासु कुसूमबाई भाऊराव बेंद्रीकर, भाया आशिलेश भाऊराव बेंद्रीकर, दिर पंडीत बाबुराव बेंद्रीकर या चार जणांसह इतर पाच जणांनी स्नेहाचा छळ केला. त्यांच्या सांगण्याप्रमाणे तुझ्यामुळेच आमचा मुलगा मरण पावला. अगोदर स्नेहला एक मुलगी झाली तेंव्हा सुध्दा मुलगा का झाला नाही म्हणून त्रास दिला. या त्रासाला कंटाळलेल्या स्नेहाने घरी गळफास घेवून आत्महत्या केली. यासंदर्भाने नायगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली होती.
रामकिशन हिंगणकर यांनी या संदर्भाने एक तक्रार अर्ज नायगाव पोलीस ठाण्यात दिला होता. परंतू नायगाव पोलीसांनी कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे रामकिशन हिंगणकर यांनी नायगाव न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल करून नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली. या प्रकरणात न्यायालयासमक्ष सादर करण्यात आलेले कागदपत्र आणि युक्तीवाद या आधारावर न्यायायलाने डॉ.बाबुराव बेंद्रीकर, त्यांच्या पत्नी कुसूमबाई आणि दोन मुले आशिलेश आणि पंडीत या चार जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 304(ब), 306, 498 (अ),323, 504, 506 आणि 34 प्रमाणे नायगाव पोलीसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश नायगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती ए.टी.गिते यांनी दिला आहे. या प्रकरणात रामकिशन हिंगणकर यांच्यावतीने ऍड. एम.एम.शेख यांनी काम केले.
नवऱ्याच्या मृत्यूनंतर महिलेला त्रास देवून आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश
