मुंबई,(प्रतिनिधी)-सहाय्यक पोलीस निरीक्षक ते पोलीस निरीक्षक पदोन्नतीचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने दिनांक 21 ऑगस्ट रोजी निर्गमित केले. परंतु, केवळ 24 तासांतच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट), मुंबई यांनी एका याचिकेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण आदेश दिल्याने, या पदोन्नती प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक लागला आहे.
मॅटमध्ये अर्ज क्रमांक 834/2025 दाखल करण्यात आला असून, त्या अनुषंगाने न्यायाधिकरणाने सामान्य प्रशासन विभागास कोणतीही पुढील कार्यवाही करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार, आस्थापना विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक सुप्रिया पाटील- यादव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकांना सध्या तरी पोलीस निरीक्षक पदावर कार्यमुक्त न करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार, पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना कळवले आहे की, ज्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन नवीन जागी बदली करण्यात आली आहे, त्यांना सध्या कार्यमुक्त करू नये. काही अधिकारी कार्यमुक्त झाले असले तरी, नवीन घटकातील प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांना हजर करून घेऊ नये. तसेच, त्यांना पुन्हा त्यांच्या पूर्वीच्या घटकातच पाठवावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मॅटच्या पुढील निर्णयानंतरच या संदर्भात अधिकृत आदेश निर्गमित करण्यात येतील. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक ते पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांना ही बढती सध्या काही दिवसांसाठी थांबवण्यात आली आहे.
