• नदी काठच्या ग्रामस्थांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन
• पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणा कार्यरत
नांदेड:- जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून सतत पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने आज सकाळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी नांदेड येथील डॉ. शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाला भेट देवून प्रकल्पाची पाहणी केली.
प्रकल्पातील एकूण 18 दरवाजापैकी सध्या 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामधून सुमारे 48 हजार 478 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी अधिक करण्यात होईल. प्रकल्पातील पाण्याची सध्याची पातळी 353.25 मीटर आहे. या भेटी दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी (SCADA) एससीएडीए रूममध्ये गोदावरी नदीवरील सर्व बंधाऱ्यांच्या पाणी पातळी संबंधांत तसेच उपसा सिंचन योजने संदर्भात सविस्तर माहिती घेतली.
पूरस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व यंत्रणा कार्यरत असून आवश्यक ती खबरदारी व उपाययोजना प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले. तसेच गोदावरी नदीकाठी असलेल्या गावातील ग्रामस्थांनी विशेष काळजी घ्यावी. सतर्क राहावे जेणेकरून जीवित हानी होणार नाही. आपले जनावरे मोकळे सोडू नये जेणेकरून पुराच्या पाण्यात वाहून जाणार नाहीत, इत्यादी खबरदारी सर्वांनी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी विष्णुपुरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सावंत, डॉक्टर उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, सहाय्यक अभियंता व इतर महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
