सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे न्यायालयाचे आदेश
नांदेड(प्रतिनिधी)-गुन्हेगार प्रवृत्तीच्या पोलीसांना पाठीशी घालून सरकारने स्वत:ला पणाला लावू नये असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक तथा सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणातील याचिकाकर्त्या विजयाबाई सुर्यवंशीचे वकील ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिटयाचिकेच्या सुनावणीनंतर ऍड. आंबेडकर हे पत्रकारांशी बोलत होते. या प्रकरणात उच्च न्यायालयाने एका आठवड्यात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाचे आदेश म्हणजे सरकारला हा झटकाच आहे.
डिसेंबर 2024 मध्ये परभणी शहरात घडलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली. त्यानंतर तेथे काही समाजकंटकांनी दगडफेक आणि जाळपोळ केली. हा घटनाक्रम दुपारी 12 वाजेच्यासुमारास घडला होता. त्यानंतर 3 वाजेनंतर पोलीसांनी तेथे लाठीचार्ज केला. मुळात तो लाठीचार्ज नव्हताच. ठरवून केलेली मारहाण होती असे अनेक तज्ञ सांगतात. कारण त्या सर्वांनी पोलीसांच्या शब्दातील लाठीचार्जचे अनेक व्हिडीओ पाहिलेले आहेत. त्याचवेळी जवळपास 50-60 लोकांना पकडण्यात आले. त्यात काही महिलांचाही समावेश होता. पुढे दोन दिवसानंतर सोमनाथ व्यंकटी सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला.
यानंतर आंबेडकरी नेते विजय वाकोडे, ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेकांनी या प्रकरणाला उचलून धरले आणि सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू हा पोलीसांच्या मारहाणीमुळेच झाला असे मुद्दे उचलले. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात सोमनाथ सुर्यवंशीचे पोस्टमार्टम झाले. तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू 36 जखमांमुळे त्यांना लागलेल्या शॉकमुळे झाल्याचाा अहवाल दिला. पण गुन्हा काही दाखल होत नव्हता. तेंव्हा ऍड. प्रकाश आंबेडकरांनी या प्रकरणात सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सुर्यवंशी यांच्यावतीने रिट याचिका दाखल केली. त्यापुर्वी या प्रकरणाची न्यायीक चौकशी झाली. म्हणतात ना पोलीस खाते करील ते होईल. त्याप्रमाणे न्यायीक चौकशीत घडले. पण ऍड. प्रकाश आंबेडकरांनी उच्च न्यायालयात मांडलेला मुद्दा असा होता की, न्यायीक चौकशीनंतर काय करावे यासाठी कायदाच नाही. म्हणून मार्गदर्शक सुचना न्यायालयाने द्याव्यात असा युक्तीवाद केला आणि उच्च न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
या आदेशाला पोलीसांनी आणि ऍड. आंबेडकरांच्या शब्दातील काही गुन्हेगारी वृत्तीच्या पोलीसांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हाण दिले. तेथे सुध्दा गुन्हाच दाखल करण्याचे आदेश प्राप्त झाले. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. पण त्यात आता फक्त एक अज्ञात आरोपी असा उल्लेख एफआयआरमध्ये आहे.
उच्च न्यायालयातल्या याचिकेची सुनावणी सुध्दा 31 जुलै रोजी होती आणि त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. म्हणून ती सुनावणी आज औरंगाबाद उच्च न्यायालयात झाली. या आजच्या सुनावणीनंतर ऍड. प्रकाश आंबेडकरांनी सांगितले की, काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोलीसांना वाचविण्यासाठी शासनाने स्वत:ला सर्वोच्च न्यायालयात पणाला लावले होते. पण आता तरी शासनाने असे काही करू नये. कारण आता उच्च न्यायालयाने एका आठवड्यात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. जुनी तपास समिती अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडून आता या प्रकरणाचा तपास काढला जाईल आणि एसआयटीला सर्व कागदपत्रे द्यावे लागतील. न्यायालयाने विजयाबाई सुर्यवंशी यांना असेही अधिकार प्रदान केले आहेत की, एसआयटीच्या तपास पथकातील सदस्यांवर काही आक्षेप असतील तर त्यांनी न्यायालयात त्याबद्दल आक्षेप नोंदवावेत. ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या सांगण्याप्रमाणे या प्रकरणातील सहआरोपींचे जाब जबाब पुर्ण होणार नाहीत. तोपर्यंत सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळणार नाही. न्यायालयातील या आदेशाने आणि ऍड.प्रकाश आंबेडकरांच्या शब्दातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोलीसांना नक्कीच एसआयटी समोर आणेल असे मानायला हरकत नाही.
संबंधीत बातमी….
परभणी सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण; झालेला लाठीचार्ज हा लाठीचार्जच्या व्याख्येत बसत नाही
