अनुदानासाठी मूळ देयके व इतर आवश्यक कागदपत्र सादर करण्याचे आवाहन
नांदेड, –राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य व पौष्टिक तृणधान्य योजनेअंतर्गत तुर, मुग, उडिद, हरभरा व ज्वारी या पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन अंतर्गत
लक्षांक प्राप्त झाला आहे. तरी किंमतीच्या 50 टक्के किंवा 2 हजार 500 प्रति हेक्टर यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. तरी तालुकास्तरावर प्राप्त लक्षांकाच्या मर्यादेत इच्छूक व पात्र लाभार्थ्यांनी सूक्ष्म मुलद्रव्य, जैविक खते, तणनाशक व पिक संरक्षण औषधी यांचे खुल्या बाजारातून खरेदी करावीत व त्यानंतर आपले गावचे सहाय्यक कृषी अधिकारी यांचेकडे मुळ देयके जीएसटी व इतर आवश्यक कागदपत्रासह सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानाअंतर्गत सूक्ष्म मुलद्रव्ये 700 हेक्टर, जैविक खते 880 हेक्टर व एकात्मिक कीड, रोग व्यवस्थापन अंतर्गत पिक संरक्षण औषधी 3 हजार 330 हेक्टर व तणनाशके 770 हेक्टर जिल्हास्तरावर लक्षांक मंजूर असून तालुकानिहाय लक्षांक वाटप करण्यात आलेला आहे.
सूक्ष्म मूलद्रव्ये : प्रत्येक शेतकरी एका हंगामात जास्तीत जास्त २ हेक्टर क्षेत्रासाठी अनुदानासाठी पात्र असेल. त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याने शिफारशीप्रमाणे सूक्ष्म मूलद्रव्ये त्यांच्या पसंतीने खुल्या बाजारातून खरेदी करावीत व त्यानंतर शेतकऱ्यांच्या आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येईल. ज्या शेतकऱ्याला या घटकांतर्गत अनुदान मिळाले आहे तो किमान दोन वर्षाच्या कालावधीसाठी पुन्हा त्याच लाभासाठी पात्र राहणार नाही.
जैविक खते : लाभार्थी शेतकऱ्यांनी द्रवरूप जिवाणू संघ प्रथम पूर्ण किंमत देऊन खरेदी करावेत. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा करण्यात येईल. शेतकऱ्यांनी जैविक खतांची खरेदी शासकीय संस्था/प्रयोगशाळा, कृषि विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रे यांचेकडून प्राधान्याने करावी व या संस्थांकडे उपलब्ध न झाल्यास खुल्या बाजारातून करावी. याबाबत खात्री करून लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येईल.
पिक संरक्षण औषधी : प्रत्येक शेतकरी एका हंगामात जास्तीत जास्त २ हेक्टर क्षेत्रासाठी अनुदानासाठी पात्र असेल. ज्या शेतकऱ्याला या घटकांतर्गत अनुदान मिळाले आहे तो किमान दोन वर्षांच्या कालावधीसाठी पुन्हा त्याच लाभासाठी पात्र राहणार नाही.लाभार्थी शेतकऱ्याने कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने लेबल क्लेम असलेल्या पीक सरक्षण औषधांची खरेदी करणे आवश्यक आहे. खरेदी करून देयके सादर केल्यानंतर आधार संलग्न बैंक खात्यात थेट अनुदान जमा करण्यात येईल.
तणनाशके : तणनाशकांच्या वापरासाठी लाभार्थी शेतकऱ्याऱ्यांनी खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने लेबल क्लेम असलेल्या तणनाशकांची खरेदी करावी व त्यानंतर खात्री करून शेतकऱ्यांच्या आधार संलग्न राष्ट्रीयकृत बैंक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येईल. तणनाशके ही पिकांसाठी अति संवेदनशील असल्याने लेबलक्लेमवर त्याच्या वापराबाबत नमूद केलेल्या सूचनांप्रमाणे व तज्ञांच्या सल्ल्यानेच तणनाशकांचा वापर करण्याची सर्वतोपरी दक्षता घेण्यात यावी असे कृषी अधीक्षक कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
