नांदेड:- नांदेडच्या केळी उत्पादकांच्या शेतीला ‘टिश्यू कल्चर’ तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. त्यामुळे केळीचे उत्पादन अधिक दर्जेदार, रोगमुक्त आणि निर्यातीयोग्य होणार आहे. केंद्र शासनाद्वारे भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड, नवी दिल्ली संस्थेच्या सहकार्याने नांदेड जिल्ह्यात ५० एकर क्षेत्रात ‘टिश्यू कल्चर’ तंत्रज्ञानाची उभारणी करण्यासाठी शुक्रवारी केंद्रीय पथकाने जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातील मौजे खुजडा येथील पन्नास एकर शासकीय गायरान जमिनीवर प्रस्तावित जागेची पाहणी केली. नांदेडसह जालना व जळगाव जिल्ह्याचादेखील यासाठी विचार करण्यात येत आहे.
‘केळी’ उत्पादनाचा उत्तम दर्जा व भरघोस उत्पादनातून शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी ‘टिश्यू कल्चर’ स्थापनेसह बीज उत्पादन, संरक्षण व संवर्धन सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पासाठी केंद्रीय पथकाने 4 जुलै 2025 रोजी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथील बैठक कक्षात डॉ. जयप्रकाश तम्मीनन यांचे समक्ष जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी सादरीकरणाद्वारे नांदेड व परिसरातील आठ जिल्ह्यात केळीचे क्षेत्र, क्षेत्र विस्तार, उत्पादन उत्पादकता आणि निर्यातवाढीच्या संधी, टिशू कल्चर रोपांची सद्यस्थितीत उपलब्धता आणि आवश्यकता यातील अंतर भरून काढण्यासाठी सदर प्रकल्पाची नांदेड जिल्ह्यासाठीची उपयुक्तता नांदेड जिल्ह्यातील रोड,रेल्वे,हवाई कनेक्टिव्हिटी, सिंचन , संशोधन केंद्र इत्यादी पायाभूत सुविधांचे पार्श्वभूमीवर प्रस्तावित प्रकल्पाची तांत्रिक अनुकूलता आणि आर्थिक व्यवहार्यता विषद केली.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिलारी किरण आंबेकर,मुदखेड तहसीलदार देऊळगावकर, केळी संशोधन केंद्राचे अधिकारी शिंदे, संचालक शीतलादेवी फार्मर प्रोड्युसर कंपनी, बारडचे निलेश देशमुख, तंत्र अधिकारी श्री स्वामी, कृषी अधिकारी चामे,कृषी अधिकारी हे उपस्थित होते.
त्यानंतर डॉक्टर जयप्रकाश तम्मिनन यांनी अधिकाऱ्यांसमवेत मौजे खुजडा तालुका मुदखेड येथील प्रस्तावित जागेची भेट देऊन पाहणी केली. या प्रकल्पाची अंतिम जागा निवड लवकरचनिश्चित होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची विशेष पूर्वतयारी :
या टिशू कल्चर प्रकल्पासाठी नांदेड,जालना आणि जळगाव जिल्ह्यातील प्रस्तावित जागांपैकी एकाच जागेची निवड होणार असल्याने या प्रकल्पासाठी नांदेड जिल्ह्याची निवड व्हावी यासाठी मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विशेष लक्ष देऊन कृषी विभाग,महसूल विभाग व केळी संशोधन केंद्राच्या समन्वयातून विशेष पूर्वतयारी केली.
– निर्यातीचा ‘टक्का’ वाढणार
या प्रकल्पामुळे नांदेडच्या केळीचा दर्जा उंचावेल आणि थेट आंतरराष्ट्रीय बाजाराची दारे खुली होतील. त्यातून केळी निर्यातीचा ‘टक्का’ वाढणार आहे. साहजिकच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील केळीचे क्षेत्र आणि उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. केळीची टिशू कल्चर रोपे कमी दरात उपलब्ध होतील.
प्रस्तावित जागेची पाहणी
नवी दिल्लीतील भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडचे वितरण साखळीचे प्रमुख डॉ. जयप्रकाश तम्मीनन यांनी प्रस्तावित शासकीय जागेची पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड, प्रभारी अधिकारी, केळी संशोधन केंद्र नांदेड,तहसीलदार मुदखेड, तालुका कृषी अधिकारी मुदखेड, तलाठी मौजे खुजडा इत्यादी उपस्थित होते.
टिश्यू कल्चर केळीचे फायदे
रोगमुक्तः नियंत्रित वातावरणात वाढ होत असल्याने संसर्गाची बाधा होत नाही.
समान वाढ : सर्व झाडे समान गुणधर्माने वाढत असल्याने समान फळांचे उत्पादन हाती येते.
जलद वाढ आणि उत्पादन : झाडे लवकर परिपक्व होत असल्याने उत्पादकाला फायदा होतो. आधुनिक उत्पादन : कोणत्याही ऋतूत केळीची लागवड केली जाऊ शकते.उत्कृष्ट दर्जाचे फळ : चांगला आकार, चव फळाचे उत्पादनाची निर्मिती होती.