12 बियाणे, खत, कीटकनाशक विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

नांदेडमधील 28 कृषी सेवा केंद्रावर कार्यवाही ; कृषी विभाग अॅक्शन मोडवर

14 बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित

नांदेड :- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची व्यापक तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत कृषी सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे. नियमबाह्य कामकाज करणाऱ्या तसेच तपासणीमध्ये त्रुटी आढळल्याने दोषी ठरलेल्या एकूण 28 कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी ही माहिती दिली आहे.

 

काही दिवसांपूर्वीच विनापरवाना खताची अवैध विक्री केल्याच्या कारणावरून इस्लापूर व हिमायतनगर येथे अवैध खत विकणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमबाह्य कामकाज करणाऱ्या इस्लापूर तालुक्यातील एका कृषी सेवा केंद्राचे तिन्ही परवाने कायमस्वरूपी निलंबित करण्यात आले आहेत. या दुकानांमध्ये परवाना नसलेले एचटीबीटी बियाणे यांची वाहतुकीच्या पावत्या अवैध्यरित्या दुकानात आढळून आल्याने इस्लापूर येथील कृषी सेवा केंद्रांचे तिन्ही परवाने कायमस्वरूपी निलंबित करण्यात आले आहेत.

 

कृषी विभागाच्या तपासणीत कृषी सेवा केंद्रातील विविध त्रुटी उघड झालेले आहेत. यामध्ये भावफलक व साठा फलक न लावणे, विक्री परवाने दुकानदाराने दर्शनी भागात न लावणे, साठा पुस्तके अद्यावत न ठेवणे, स्त्रोत परवान्यात नमूद नसणे, ग्राहकांना निविष्ठा विक्रीच्या पावत्या न देणे, विक्री अहवाल दर महिन्याला सादर न करणे इत्यादी विविध प्रकारच्या त्रुटी आढळल्या आहेत. त्यांची सुनावणी घेण्यात आली व त्यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली.

दरम्यान अशा 28 कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आलेली आहे. याशिवाय विक्री परवानगी घेतली असतानाही दुकान बंद ठेवणाऱ्या केंद्रावरही मोहिमेत विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. या कारवाईमध्ये तालुका नायगाव येथील आठ कृषी सेवा केंद्राचा समावेश असून हदगाव तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्र तसेच नांदेड तालुक्यातील एक कृषी सेवा केंद्र, देगलूर तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्र, कंधार तालुक्यातील एक कृषी सेवा केंद्र, किनवट तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्र, मुखेड तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्र, उमरी तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्र, लोहा तालुक्यातील एक व मुदखेड तालुक्यातील एक कृषी सेवा केंद्र यांचा समावेश आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि नियमानुसार सेवा मिळाव्यात यासाठी ही मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. अशाच प्रकारची नियमित तपासणी सुरु राहणार असून, नियमभंग करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!