दिनांक २८ मे २०२४ ची सकाळ, माझी मुलगी श्रीनिधी नेहमीप्रमाणे तिच्या आजी सोबत गोष्टी ऐकत झोपली होती, तीने सकाळी ७ ते ७.३० चे दरम्यान उठून खूप विव्हळत, रडतच दरवाजा वाजवून आम्हाला उठवलं. रात्री हसत, गप्पा मारत, आमच्या दोघांच्या ही पाया पडून आणि शुभ रात्री म्हणून झोपायला गेलेली माझी लाडकी लेक अचानक ईतकं रडत का बर उठली? असं पाहून काळीज चर्र केलं. ती रडतच सांगत होती पोट खुप दुखतयं… तिच्या चहेऱ्यावरून, रडण्यावरून तिच्या वेदना स्पष्ट दिसत होत्या. असह्य वेदना पण थोडा आराम मिळावा म्हणून पत्नीने सुरुवातीस घरगुती उपाय करून पाहिले. पण दुखणे क्षणभरही थांबत नव्हते. वेदनातर खुपच होत्या.
माझी शासकीय नोकरी व बदली हिंगोली येथे असल्याने मी कारने ये-जा करीत होतो आणि माझ्या कार मध्ये माझ्यासोबत इतरही सहकारी असल्यामुळे व अगदी वेळेवर रद्द करणे शक्य नसल्याने मला हिंगोलीला जाणे भाग होते.त्यातच सकाळी आठ वाजता डॉक्टर तरी कोण भेटणार. वाटलं सामान्य पोट दुखी असेल मुलं अरबट चरबट खातात तसं काही खाण्यामध्ये आले असेल किंवा खेळण्यात उड्या मारण्यामध्ये काही चुकले असेल त्यामुळेच त्रास होत असेल काही वेळाने थांबेलच. म्हणून मी नोकरी साठी बाहेर पडलो आणि असं ही माझा मेव्हणा होताच जो माझ्या इतकाच तिची काळजी घेईल याचा पूर्ण विश्वास होता आणि घरात सासुबाई, २ आत्या, मामा अशी इतरही मंडळी होती ते ही काळजी घेतील. मन मानत नव्हते पण जाणे भाग असल्याने अनिच्छेने का होईना देवावर विश्वास ठेवून निघालो.
मी प्रवासात होतो पण मन मात्र घरी लेकीवरच होतं, ईतर मंडळी होती पण मी ठरलो शेवटी बाप. लेक म्हणजे बापाचं काळीज. प्रवासात दोन वेळेला कॉल लावून विचारणा केली कमी वाटतंय का, पण नाही जास्तच दुखत आहे असं कळालं, मग काय ड्रायव्हिंग करताना डोक्यात विविध विचार चालू झाले.
हिंगोलीत पोहोचलो तिथूनही विचारणा चालू होती, नांदेड मधील डॉक्टर त्यांचे सल्ले उपचार पद्धती
याबद्दल बरेच काही बरे वाईट अनुभव ऐकून होतो, त्यामुळे साशंकता होती.माझी पत्नी आणि मेहूणा यांनी प्रथम आमच्या परिचयाच्या स्त्री रोग तज्ञांकडे दाखविण्यास नेले. एवढ्या सकाळी त्यांनी सुद्धा त्यांचे काम बाजूला सारून तत्परतेने तपासणी केली आणि सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिलाव एका महिला डॉक्टर कडे पाठवलं.वेदना चालूच होत्या दहा वाजता सोनोग्राफी झाली. त्या डॉक्टरांनी सोनोग्राफी करून स्मॉल अपेंडिक्सचे निदान केलं.स्त्री रोग तज्ञांच्या दृष्टीने हे दूखणे स्त्री रोगाशी संबंधित नसल्याने त्यांनी पोट विकार तज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला. ते रिपोर्ट घेऊन माझी पत्नी व मेव्हणा एका प्रसिद्ध पोट विकारतज्ञ डॉक्टरकडे गेले असता त्यांनी अपेंडिक्स आहे ऑपरेशन तात्काळ करावंच लागेल असं सांगितलं, उद्या ऑपरेशन करून टाकू अपेक्षित खर्च वगैरे सगळं सांगितल काही औषधे दिली आणि लगेच ऍडमिट करायला सांगितले. पण मला आधीपासून नांदेड मधील डॉक्टरवर शंका असल्याने जेंव्हा याबाबत बाहेरगावी असलेल्या मला माझ्या पत्नीचा फोन आला तेंव्हा मला ऑपरेशन म्हटले की मनात धडकी भरली पण त्या वेळेस आम्ही अनभिज्ञ होतो की, या ऑपरेशन पेक्षाही मोठे संकट आपल्या समोर आहे. मी माझ्या पत्नीला सांगितले इतर कुठेही जावू नकोस कारण आपल्याकडे ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येईल, ज्यांच्या ज्ञानावर, बुद्धीवर, निर्णयावर, अचूक निदान करण्याच्या क्षमतेवर, कुणाही पेक्षा अधिक विश्वास आहे. असे विश्वासू बालरोगतज्ञ मा. श्री.लक्ष्मीकांतजी बजाज आहेत. त्यांचेकडे जा तेच निधीवर अचूक उपचार करतील.
माझ्या पत्नीलाही तसंच वाटत होतं ती पण त्या पोट विकाराच्या डॉक्टरांना तसं सांगून बजाज सरांकडे गेली. आणि तोच आमचा निर्णय आमच्यासाठी व आमच्या लेकीसाठी जीवन बदलणारा ठरला. डॉक्टर साहेबांनी रिपोर्ट पाहताच रिपोर्ट व सध्याची पोटदुखीचे लक्षण, पोटदुखीची जागा, होणारा त्रास या सर्व अनुभवावरून अपेंडिक्स असण्याची शक्यता नाकारली. सरांना प्रथम तपासनीतच बहूदा शंका आली असावी असे त्यांच्या चहेऱ्यावरून वाटत होते. त्यांचा चहेरा जरा गंभीर वाटत होता. जिथे सोनोग्राफी रिपोर्ट अपेंडिक्स आहे हे सांगत होते. पोट विकार तज्ञांचेही म्हणणे तेच होते तेथे हे अपेंडिक्स नाही हे बजाज सरांनी तात्काळ सांगितले. त्यांनी प्रथम उपचार केले आजपर्यंत आमच्या मुलांना कधीही ऍडमिट करून न घेणारे सर मात्र त्यांनी दिवसभर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मुलीला थांबवून घेऊन उपचार सुरू केले, वेदना अगदी थोड्या कमी झाल्या परंतु अजूनही त्रास होतच होता. ती प्रचंड विव्हळत होती. आई म्हणून माझ्या पत्नीचे मुलीला होणारा त्रासात तिच्यासोबत राहणे आणि तिच्या वेदना पाहणे म्हणजे एखाद्या आईला मातृत्वाची परीक्षा देण्यासारखे होते. पण ती खंबीरपणे आपल्या डोळ्यातील अश्रू लपवून व जीवाची कालवा कालव चेहऱ्यावर न दाखवता हिमतीने तिला सांभाळत होती. तिला हिम्मत देणारा तिचा पाठचा भाऊ स्वप्निल तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. मी मात्र हिंगोली येथेच हतबल थांबलो होतो, संध्याकाळ होण्याची वाट पाहिली आणि कार्यालयीन वेळे आधीच वरिष्ठांना माहिती देऊन व त्यांची परवानगी घेऊन साकाऱ्यांसह आम्ही सगळे नांदेडला परतीला निघालो. नांदेडमध्ये येईपर्यंत तिच्या वेदना बऱ्यापैकी कमी झाल्या असल्याचे पत्नीने फोनवर सांगितले, तरी डॉक्टर साहेबांनी काळजी घेणे आवश्यक आहे असे सुचविले आणि मी नांदेडमध्ये आलो, सहकाऱ्यांना सोडून सरळ दवाखान्यात पोहोचलो, मुलीचा डिस्चार्ज घेऊन घरी आलो, दिवसभराच्या प्रचंड वेदनेने सतत हसणारी माझी लेक पार कोमेजून गेली होती, डोळे खोल गेले होते परंतु औषधी गोळ्यांच्या प्रभावाने तिला झोप येत होती. मग माझ्या मेव्हण्याने उचलून तिला घरी वरच्या मजल्यावर आणलं थोडसं खाऊन ती झोपी गेली. आम्ही मात्र जागीच कळत नव्हत असं कसं अचानक घडलं.
पण आता ती झोपली असल्यामुळे हायसं वाटत होतं, तिच्याकडे बघतच मध्यरात्री उशिरा कधीतरी आम्हालाही झोप लागली. सकाळचे सहा-साडेसहा झाले असतील परत तिला थोड्या थोड्या वेदना जाणवू लागल्या कालच्या वेदनेतून ती पूर्णतः सावरलेली नव्हती त्यामुळे तिला भीती वाटत होती. आम्हीही उठलो थोड्याच वेळात परत कालच्या प्रमाणेच वेदना सुरू झाल्या, तोच प्रचंड त्रास त्याच कळा आमचं शहाणं लेकरू धायमोकलून रडू लागलं. परत आमच्या जीवाची कालवाकालव. काल डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या औषधे देऊन सात-साडेसात पर्यंतचा वेळ निभावला पण वेदनेत फरक पडेना त्या वाढतच चालल्या. हिंगोलच्या सहकाऱ्यांना रात्रीच कल्पना दिली होती की आजार वाढल्यास मी उद्या येणार नाही तसं त्यांना लगेच कळवून टाकलं. लगेच डॉक्टर साहेबांना एका परिचिता कडून फोनद्वारे माहिती कळवली. नेहमी अकराच्या नंतर क्लिनिकला येणारे डॉक्टर साहेब मात्र त्यांनी माझ्या मुलीची गंभीर परिस्थिती ओळखून साडेनऊ-दहापर्यंतच क्लिनिक गाठलं. आम्ही पोहोचलो. सरांनी परत तपासलं, त्यांना एक वेगळी शंका आली त्यांनी परत एकदा त्यांच्या परिचयाच्या अनुभवी डॉक्टरांकडे (डॉ.अग्रवाल) सोनोग्राफीसाठी पाठवलं, चिठ्ठीवर वैद्यकीय भाषेत काहीतरी लिहिलं जे आम्हाला समजलं नाही, डॉक्टर साहेबांकडे गेलो असता सोनोग्राफी करतानाच डॉक्टर आवाक झाले. आणि तात्काळ बजाज सरांना फोन करून शरिरात कुठे पाणी जमा झाले आहे का हे पाहण्यासाठी X-Ray सुद्धा काढणे आवश्यक असल्याचे सांगितले. दोघांच्याही चर्चेवरून आतापर्यंत आम्हाला हे तर नक्कीच कळाले होते की काही तरी गंभीर आहे. एक्स-रे नंतर त्यांचा गंभीर चेहरा पाहून भीती वाटली त्यांना विचारलं काही गंभीर आहे का डॉक्टर साहेब तर त्यांनी हं इतकंच म्हटले आणि बजाज सरांना दाखवा ते सांगतील असं कळवलं. तो रिपोर्ट घेऊन आम्ही डॉ. बजाज सरांकडे गेलो, त्यांच्या चेहऱ्यावर ही एक वेगळीच चिंता आणि प्रश्नचिन्ह जाणवलं आमच्या मनात पाल चुकचुकली…
आणि तसेच निघाले …
आम्ही म्हणालो असं काय आहे सर रिपोर्ट मध्ये, ते म्हणाले माझी शंका खरी निघाली स्वादुपिंडाचा आजार असल्याचं दिसत आहे, त्याला इंग्रजीत “Acute pancreatitis” असं नाव आहे. हा एक वेगळा आजार आहे, खूप दुर्धर सहसा लहान मुलांना होत नाही आणि मुलींमध्ये तर नगण्यच आढळतो. हा मोठ्यांना होणारा त्यातल्या त्यात व्यसन असेल तर होणारा आजार. ज्याचे निदान सहसा कोणत्याही डॉक्टरांना एवढ्या सहज करणे शक्य नाही. अशा दुर्धर आजाराचे निदान बजाज सरांनी एका दिवसात केले. विशेष म्हणजे अगदी त्याच काळात याच रोगामुळे निदान न झाल्याने बुलढाणा येथील डॉक्टरांच्या मुलीचे प्राण वाचवता आले नाहीत,अशी बातमी आणि लेख सर्वत्र सोशल मीडियावर प्रसारित होत होता. माझ्या मुलीला झालेल्या रोगाचे निदान केवळ एका दिवसात बजाज सरांनी केले. उपचार आवश्यक आहेत. आजार जीवघेणा आहे ह्याची ही कल्पना आम्हाला दिली. तशी ती आम्हाला ही होतीच कारण वर्षभरापूर्वी माझ्या आतेभावाचे याच आजाराने निधन झाले होते.
सर म्हणाले मी उपचार चालू करतो या उपचाराला वेळ लागत असतो, होणाऱ्या वेदना-कळा ह्या बाळंतपणात स्त्रियांना होणा-या वेदनेच्या पाचपट जास्त असतात, औषधी महाग असतात पण होईल हळूहळू कमी, त्रास तर सहनच करावा लागतो आणि त्यांनी उपचार चालू केले नांदेड मधील अपुऱ्या वैद्यकीय सुविधेच्या आधारावर मागोवा घेणे कठीण होते तरी त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या जोरावर योग्य ती औषधी देणे सुरू केले. परंतु आम्ही मुलीच्या वेदनांनी पूर्णतः घाबरलेलो होतो यापेक्षा जास्त त्रास आम्हाला पहावत नव्हता त्यामुळे आम्ही हैदराबाद येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोलॉजी (AIG) येथे तिला हलवण्याचे निश्चित केले. सरांनी देखील मुलीच्या हितासाठी आपला कुठलाच अहंभाव स्वार्थ न दाखवता AIG हैदराबाद येथे जाण्याचे रेफर केले. आम्ही रात्रीतच थेट हैदराबाद गाठलं, सकाळी साडेचार वाजता AIG हॉस्पिटलमध्ये पोहचलो तिथे आमच्या नशिबाने या दुर्धर आजाराचे आधुनिक ज्ञान असलेले व सर्वात निश्नात तज्ञ असलेले तरुण डॉ. पी. चंदन हेच आम्हाला सामोरी आले.
त्यांनी प्रथमोपचार केले आणि नांदेडचे सोनोग्राफी व इतर रिपोर्ट्स पाहिले त्यांच्या दृष्टीने नांदेडची रिपोर्ट हे चुकीचे असावेत कारण हा आजार लहान मुलांना होणे अतिशय दुर्लभ व त्यातही मुलींना क्वचितच, तरी त्यांनी ऍडमिट करून घेतल्यानंतर त्यांच्या स्तरावर परत रिपोर्ट घेऊनच निर्णय देण्याचे सांगितले आणि ज्यावेळी सर्व तपासण्याहून तेथील रिपोर्ट समोर आले त्यावेळी त्यांनी आश्चर्याने आम्हाला विचारले की तुमच्या नांदेडचे हे बजाज डॉक्टर कोण? त्यांचे रिपोर्ट्स व त्यांचे निदान खरे आहेत. तसेच त्यांनी दिलेले औषधी सुद्धा एकदम योग्य आहेत जे की सामान्य बालरोग तज्ञांनाच काय पण पोट विकार तज्ञांना सुद्धा कळणे शक्य नाही. जर तुम्ही इतर डॉक्टरांची एकूण तिच्या अपेंडिक्स चा उपचार केला असता ऑपरेशन केलं असतं तर तुमची मुलगी तुमच्या हाताला लागली नसती.तुमच्या डॉक्टरांचा नंबर द्या मला त्यांना बोलायचं आहे.तुम्ही लकी(नशीबवान) आहात की, तुमच्या मुलीच्या आजाराचं इतक्या लवकर योग्य निदान झालं आणि तिला बेस्ट ट्रीटमेंट (उपचार)भेटली. हे ऐकून आम्ही दोघेही पती-पत्नीने एकमेकांकडे चकित होऊन पाहिले आणि मनात डॉक्टरांचे व ईश्वराचे वारंवार आभार मानले.
त्यानंतर पुढे भारतातील त्या आजाराच्या तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिचा इलाज झाला आणि सहा दिवस ए.आय.जी. रूग्नालयात उपचार घेवून त्यांनी डिस्चार्ज दिला आम्ही नांदेडला परत आलो. आलेल्या दुसऱ्या दिवशीच ए.आय.जी. रूग्नालयातील सर्व कागद सरांना दाखविले.दोन महिने दुखणे चालू राहिल थोडे कमी थोडे जास्त असे होत होत पुर्ण कमी होईल. असा विशव दिला. प्रत्येक वेळेला छोट्या छोटया गोष्टींसाठी सतत सरांना त्रास दिला त्यांचे सल्ले घेतले. सरांनी कधीच कोणत्याही प्रकारची नाराजी दाखविली नाही. माझी पत्नी तर मुर्खासारखे छोटे छोटे प्रश्न, शंका सरांना विचारायची सरांनी प्रत्येक शंकेचे निरसन केले. आज माझी मुलगी पूर्ण बरी झाली आहे ती माझे आराध्य भगवान श्री व्यंकटेशाच्या कृपेने व डॉ.लक्ष्मीकांत बजाज यांच्याचमुळे, त्यांच्या अचून निदानामुळेच.
दिवस येतात- जातात, संकटे येतात-जातात पण त्या संकटांचे व त्या वाईट दिवसांची आठवण जरी आली तरी अंग शाहारुन येतं.विचार येतो जर बजाज सर नसले असते तर! जर आम्ही त्या डॉक्टरांचं ऐकून अपेंडिक्सचं ऑपरेशन करून घेतलं असतं तर! तर आज काय झालं असतं.. आज आमची मुलगी बरी आहे ती फक्त डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांच्या मुळेच हे आम्ही कधीही विसरू शकत नाही.
ही डॉ. लक्ष्मीकांत बजाज सरांसारखे देवदूत आहेत म्हणूनच आपण सुरक्षित आहोत. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांनी अशा डॉक्टरांचा आदर्श घेऊन त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
खरंच मी देवदूत पाहिला.त्या घटनेनंतर एका वर्षाने माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सरांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्राची आई महालक्ष्मी यांची प्रतिमा भेट देऊन गरिबांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांचे हात मजबूत राहू दे अशी प्रार्थना केली दिली तो क्षण.
– शरदचंद्र साहू
नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालय