वयाच्या अंदाजे आठव्या वर्षी वस्तीवरील लोकांबरोबर आषाढी वारीला पंढरपूरला गेलो होतो.
वस्तीवरील बहुतांश लोक छपराच्या घरात राहत. शेतात राबत. दुष्काळात मजुरी करत. वारीतल्या अनेक गोष्टी मला आजही आठवतात.
सोबतच्या भाकरी व तळलेले पदार्थ खाल्ल्याचे. नदीतील उघड्याने अंघोळ केल्याचे. ती मोठी गर्दी. वडिलांच्या खांद्यावर बसून रेटारेटीत मंदिराच्या कळसाला हात जोडल्याचे. तोंडातून काहीतरी पुट पुटत वडिलांनी हात जोडल्याचे.परत आल्यावर आईने मला जवळ घेऊन पंढरपूरच्या दिशेला हात जोडून काहीतरी पूट पुटल्याचे.
वस्तीवरील लहान थोर आम्हा सगळ्यांच्या पाया पडल्याचे. आणखी बरेच काही आठवते.
माझ्या आई-वडिलांसह पंढरीला गेलेल्या प्रत्येक वारकऱ्यांनी पुट पुटत देवाला काय मागितले असावे?
“देवा पांडुरंगा आम्हाला सुखी ठेव!” असंच काहीतरी असावे. पंढरीचे आकर्षण एवढे का? मारुतीच्या देवळात दर शनिवारी होणाऱ्या भजनात मी भाग घेत असे. एक अभंग नियमित म्हटला जाई.
“पंढरीशी जारे आल्यानो संसारा!
दिनाचा सोयरा पांडुरंग !
या जन्मात पंढरपूरला गेले पाहिजे कारण तिथे दिनांचा म्हणजे गरिबांचा सोयरा नातेवाईक पांडुरंग हा तिथे राहतो.
विठोबाच्या सरकारी पूजेला विरोध करणारा हा बाबा आढाव कोण? सुरुवातीस त्यांचा राग यायचा पण पुढे त्यांचा त्या मागणी मागील हेतूचा उलगडा होऊ लागला. आणि राज्यघटना काय सांगते हे समजायला लागले. सकाळ पेपर वाचताना गरिबी, शोषण या बद्दल कार्ल मार्क्स यांचा लेख वाचण्यात आला. गरिबांच्या सुखदुःखाबद्दल पुढे बरेच वाचले. पोलीस अधीक्षक सातारा असताना वारीच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळली.
‘ हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा!
पुण्याची गणना कोण करी!’
असे हाता मध्ये टाळ, कपाळी बुक्का लावून दरवर्षी आषाढी वारीत सामील होणाऱ्यांना मिळून मिळून असे
किती पुण्य मिळणार? मिळवलेले हे पुण्य आमचं दारिद्र्य दुःख कमी करून आम्हाला सुखी कसं करणार? असे प्रश्न पडू लागले. आणि अजूनही पडतात. नुकत्याच पार पडलेल्या कुंभमेळ्यात 40 कोटी पेक्षा जास्त लोकांनी डुबकी मारली. आणि पुण्य मिळविले. एवढ्या मोठ्या संख्येने शाही स्नान वआषाढी वारी केल्याचे हे इतर देशात कुठे दिसत नाही.मग आमच्या वाट्याला किती सुख आलं? सुख मोजण्याची फुटपट्टी जगभर मान्य झालेली आहे. त्यात सहा घटक आहेत. त्या देशाचे वार्षिक उत्पन्न (जीडीपी), सुरक्षिततेची भावना, भ्रष्टाचाराचे प्रमाण, आरोग्य व आयुर्मान, माणसा माणसातील सद्भाव आणि जगण्याचे स्वातंत्र्य, इतरांना मदत करण्याची वृत्ती. या मोजपट्टीवर आमचा देश147 देशात 118 क्रमांकावर आहे. पाकिस्तान 109 व्या क्रमांकावर आहे. मग पवित्र स्नान आणि ही मोठी दिंडी यातून मिळणारे पुण्य या देशात नक्की कुणाला मिळते?
देवा पांडुरंगा आम्हाला सुखी ठेव ही मागणी
जगभर होते. प्रत्येकाचा पांडुरंग वेगळा असतो. नदीतील डुबकी, आषाढी वारी हे सुख मिळविण्याचे मानव जातीचे एकमेव मार्ग नाहीत.नक्की सुख काय आणि ते कसे मिळवायचे याबद्दल काही मोजके ग्रंथ मी वाचले. एम् स्कॉट पेक यांचे ” The Roadless Travelled” द रोडलेस ट्रॅव्हल” हे बरंच काही वास्तव दाखवून गेलं. त्यांनी सुरुवातच केली की “जीवन हे गुंतागुंतीचे commplex आहे” .
कठीण difficult आहे.”
ते पूर्वीही होते. ते असे दुःखी का बनते? तर मानवाला जन्मतःच काही शत्रू आहेत. आळस हा पहिला शत्रू. भीती दुसरा शत्रू, कामाचे यश, फल तात्काळ मिळाले पाहिजे ही चुकीची इच्छा, सत्याची कास धरण्यामध्ये कमतरता. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये समतोल राखला जात नाही. हे दोष कमी केले तर हे गुंतागुंतीची आयुष्य सुकर होईल अशी त्याने मांडणी केली. ही विचारधारा जगभर मान्यता पावलेली आहे. कोणी कितीही हेटाळणी केली तरी मी दरवर्षी कुठे ना कुठे दिंडीमध्ये चार पावलं चालून माझे समाधान करून घेतो. करूया वारकरी धर्म बनशाली असं नाव घेऊन मोजकी माणसं आम्ही दर महिन्याला भेटत असतो. शेकडो वर्ष वारकरी दिंडी या नावाने जाणारा हा जथा आज आणि उद्या आणखी प्रभावी आणि परिणामकारक बनवता येईल का? की कार्ल मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे धर्म ही अफूची गोळी आहे का? बोलूया जमेल तसे.
–सुरेश खोपडे