नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील जवळपास 27 मोठ्या लोकांची नावे असलेल्या एका आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यात नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हा शाखेने शिळ्या कडीला उत आणला आणि त्या प्रकरणातील दोन जणांना नांदेड येथील विशेष न्यायालयाने आठ दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
सुधीर नागोराव देशमुख यांनी 24 जून 2024 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 288/2024 दाखल झाला. त्यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 420, 406, 409, 34 सह एमपीआयडी कायदा कलम 3 आणि 4 जोडलेली आहेत. या फिर्यादीमध्ये नांदेड शहरातील 27 श्रीमंत लोकांची नावे होती. पण त्या सर्वांना न्यायालयाने अटक पुर्व जामीन दिला. फिर्यादीप्रमाणे राजस्थानी मल्टीस्टेट को.ऑप.के्रडीट सोसायटी लि. गुरुकृपा मार्केट महाविर चौक यांनी टी.व्ही.9 मराठी जाहीरातीच्या माध्यमातून आणि त्यांचे मुख्य कार्यालय परळी वैजनाथ येथून दिलेल्या जाहीरातीनुसार तुम्ही खाते काढा, फिक्स डिपॉझीट करा आणि इतर बॅंकांच्या तुलनेत तुम्हाला जास्त व्याज मिळेल अशा या जाहीरातींना फसून सुधीर देशमुख यांनी तेथे पैसे गुंतवले. हा प्रकार 30 डिसेंबर 2023 ते 24 जून 2024 पर्यंत चालला.
या प्रकरणात पोलीसांनी अंबेजोगाई जि.परळी वैजनाथ येथे न्यायालयीन कोठडीत असलेल्या चंदुलाल मोहनलाल बियाणी यास हस्तांतरण वॉरंटवर नांदेडला आणले. त्यांची पोलीस कोठडी घेतली. ती संपल्यावर सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्थिक गुन्हा शाखा नांदेडने चंदुलाल बियाणी यांच्याकडून घेतलेल्या माहितीनंतर बद्रीनारायण छगनलाल बियाणी (63) रा.परळी वैजनाथ आणि प्रेमलता बद्रीनारायण बाहेती (60) या दोघांना इचलकरंजी येथून अटक करून नांदेडला आणले आणि नांदेडला त्यांची अटक 16 जून 2025 रोजी सकाळी 7 वाजता दाखवली. हे सर्व पोलीस अभिलेखात लिहिले आहे. 17 जून रोजी दुपारी त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. त्या अभिलेखात असे नमुद आहे की, 48 गुंतवणुकदारांची 3 कोटी 60 लाख 59 हजार 356 रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. त्यामुळे तपासाच्या प्रगतीसाठी या दोघांना पोलीस कोठडी द्यावी असा युक्तीवाद सहाय्यक सरकारी वकील ऍड. अब्बास यांनी मांडला. विशेष न्यायालयाने या दोघांना आठ दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
3 कोटी 60 लाख 59 हजारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एक महिला आणि एक पुरूषांला आठ दिवस पोलीस कोठडी
