नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कीर्ती सध्या काही वेगळ्याच कारणांमुळे हवेत तरंगत आहे. एरवी गुन्हेगारांचे निर्दालन करण्याचे अधिकार असलेल्या या शाखेतील एका पोलीस अंमलदाराने चक्क स्वतःचाच वेगळा न्याय सुरू केल्याचे समोर आले आहे. दवाखान्यात उपचार घेत असलेल्या शेख अकबर उर्फ शेरू यांनी थेट स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार शेख इम्रान यांच्यावर गंभीर आणि तितकेच रंजक आरोप केले आहेत. आरोप करणाऱ्या व्यक्तीच्या मते, पोलीस अंमलदार शेख इम्रान यांनी मुजाहिद आणि कडक नावाच्या दोन हस्तकांकरवी शहराच्या नुरी चौक भागात त्यांच्यावर जीवघेणा हल्ला घडवून आणला. आता मारहाण करण्याचे कारण काय, तर पोलीस महाशयांनी काहीतरी काम करायला सांगितले होते, ज्याला नकार देण्यात आला. पोलिसांचे ऐकले नाही की थेट नुरी चौकात प्रसाद मिळतो, हा पोलिसांचा नवा खाक्या पाहून नांदेडकरांचे डोळे विस्फारले आहेत. या प्रकरणात ३ लाख रुपयांच्या देवाणघेवाणीचाही काहीतरी गूढ घोळ आहे, पण हे पैसे नक्की कोणाकडून यायचे, याबद्दल स्पष्टपणे बोलण्यास सर्वच जण कचरत आहेत. या पीडित व्यक्तीच्या विरुद्ध देखील काही गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. चोरांचे गुप्त संदेश आणि साहेबांचे मोबाईल! आता या मारहाण करणाऱ्या पोलीस अंमलदाराचा पूर्वइतिहास ही तितकाच उज्वल आहे. स्थानिक गुन्हे शाखेत येण्यापूर्वी ते नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात कार्यरत होते. तिथे कार्यरत असताना पाकीटमार आणि चोरांचे कॉल साहेबांना येत असल्याचे आणि चोरांनी साहेबांना दिलेले गुप्त संदेश अनेकांनी प्रत्यक्ष ऐकल्याची जोरदार चर्चा आहे! गुन्हेगारांच्या अगदी जवळ असणारे असे पोहोचलेले पोलीस जेव्हा स्थानिक गुन्हे शाखेत काम करतात, तेव्हा नांदेड जिल्ह्याचे गुन्हेगारीपासून निर्विघ्न निर्दालन नक्कीच होणार, यात तीळमात्र शंका नाही. या प्रकरणाबाबत बोलण्याचे काही ऑडिओ रेकॉर्डिंग देखील उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यात अजून पूर्ण स्पष्टता आलेली नाही. आता या गंभीर पण तितक्याच हास्यास्पद प्रकारावर वरिष्ठांचे काय मत आहे आणि नांदेड पोलिसांची ही खास गुन्हे शोध पद्धत कधी थांबणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,099 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पायाभूत सुविधांचे लीकेज: १२०० कोटींची संसद आणि पाण्याखालील भारत! बंगालमध्ये पुन्हा निवडणुका होणार? सर्वोच्च न्यायालयात ९०% बेईमानीचे धक्कादायक पुरावे सादर!