मान्सूम पूर्व कामे यंत्रणांनी वेळेच्या आत पूर्ण करावी –जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

नांदेड :- मान्सूम काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या विभाग प्रमुखांनी योग्य ती खबरदारी घेऊन मान्सूम पूर्व कामे वेळेच्या आत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले. नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदी आणि इतर लहान-मोठ्या नद्या लक्षात घेता जवळपास 337 गावांना पुरांचा धोका उद्भवू शकतो. जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या-त्या भागातून सुरक्षिततेच्या उपाययोजना योग्य पद्धतीने जिल्हा प्रशासनाला हाताळता याव्यात यादृष्टिने सर्व यंत्रणानी दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

मान्सून 2025 च्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले यांच्यासह परिवहन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महानगरपालिका, आरोग्य, कृषि, महसूल विभाग, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मृद व जलसंधारण, विद्युत, पोलीस, अग्निशमन, शिक्षण, पशुसंवर्धन, रेल्वे आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पावसाळयात उद्भवणाऱ्या विविध आपत्तींना तोंड देण्यासाठी आणि सावधगिरीच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले, जिल्ह्यात 337 गावे पूरग्रस्त आहेत. या गावात रंगीत तालीम घ्याव्यात. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणाची आवश्यक साहित्यांची खरेदी करावी. 24 तास नियंत्रण कक्षाची स्थापना करुन कक्षातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक अद्यावत करावेत. आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी उपस्थित राहतील यांचे नियोजन करावे. आदिवासी व ग्रामीण भागात सर्पदंशासह इतर आजारांवरील उपचार स्थानिक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातच करावेत. रुग्णाला औषध उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासू नये. आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी आरोग्य पथकांची नियुक्ती करावी. पावसाळयात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलकपणे औषधी, रक्तसाठा इतर अनुषंगिक साहित्य उपलब्ध करावीत. ब्लिचिंग पावडरची साठवणुक सुरक्षितपणे ठेवून त्याचा योग्य उपयोग करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आरोग्य विभागाला दिले.

शहरातील नाल्याची स्वच्छता करुन घ्यावी. गावांना धोका होऊ नये यादृष्टीने पाझर तलावाची दुरुस्ती करुन गाळ काढावा. शहरातील धोकादायक इमारतीची पाहणी करुन नोटीस देवून नियमानुसार कारवाई करावी. पुर परिस्थितीत नदी काठच्या लोकांचे स्थलांतर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. सुरक्षित स्थळे निश्चित करावीत. तसेच महावितरण, जिल्हा पुरवठा कार्यालय, शिक्षण विभाग, पशुसंवर्धण विभाग, कृषि विभाग यांनाही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या.

सर्व प्रमुख यंत्रणांनी या मान्सून कालावधीत नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवावीत. पाटबंधारे विभागाने गोदावरी व इतर नदीच्या पाणी पातळीचा धोका, इशारा पातळीबाबत उपाययोजना करतांना सर्व विभागांशी समन्वय ठेवून धरणनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तालुकास्त्रावर मान्सुन पूर्व तयारीची आढावा बैठक घेवून पूर परिस्थिती प्रतिबंधक कामे मान्सून पूर्वी करावीत. आपत्कालिन नियंत्रण कक्षातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोबाईल संपर्क अद्यावत करावीत. वाहन व्यवस्था सुस्थितीत ठेवावी. विजपातामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी जनजागृती आणि बचाव कार्याचे रंगीत प्रशिक्षण पूर्ण करावेत. नगरपालिका प्रशासनाने शहरातील नाली साफसफाईचे कामकाज युध्द् पातळीवर करावेत. आपत्ती निवारणाची कामे सक्षमपणे पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाबाबत करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!