शैक्षणिक उपक्रम राबवून जयंती साजरी करण्याचे आवाहन
नांदेड – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दि. 14 एप्रिल रोजी असून या जयंतीचे औचित्य साधून शहर आणि जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीम जयंती मंडळ, उत्कृष्ट देखावे व शिस्तबद्ध जयंती साजरी करतील अशा जयंती मंडळांना मराठी नाऊ फाऊंडेशन आणि समृद्ध जीवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विध्यमाने बक्षीस दिले जाणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत मराठी नाऊ फाऊंडेशनचे अध्यक्ष इंजि.प्रवीण खंदारे यांनी दिली. तसेच त्यांनी शैक्षणिक उपक्रम राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दि. 7 एप्रिल रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष इंजि. प्रवीण खंदारे यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्यभर उपेक्षित आणि वंचित समाजाला न्याय देण्यासाठी काम केले. शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा हा त्यांचा मूलमंत्र आहे. शिक्षणाशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही, हे त्यांनी दाखवून दिले आहे. भारतात आणि जगात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी नाऊ फाऊंडेशन आणि समृद्ध जीवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे, त्या पार्श्वभूमीवर नांदेड शहर आणि जिल्ह्यामध्ये डॉ. आंबेडकर भीम जयंती मंडळ हे शैक्षणिक उपक्रम आणि मिरवणूक शिस्तबद्ध काढतील, सगळ्या नियमांचे पालन करतील अशा उत्कृष्ट जयंती मंडळांना, उत्कृष्ट देखावे सादर करणार्या जयंती मंडळांना बक्षीस दिले जाणार आहे. पहिला पुरस्कार स्मृतीचिन्ह आणि रोख 21 हजार रूपये, दुसरा पुरस्कार स्मृतीचिन्ह आणि रोख 11 हजार रूपये, तिसरा पुरस्कार स्मृतीचिन्ह आणि रोख 5 हजार रूपये दिले जाणार आहेत. त्याशिवाय सर्व सहभागी मंडळाचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन पुरस्कार सोहळ्यात गौरव केला जाणार आहे. सहभाग नोंदवण्यासाठी 9168916890 या मोबाईल क्रमांकावर नोंदणी करून जयंती मंडळांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असेही इंजि. प्रवीण खंदारे यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केवळ एक दिवस साजरी न करता वर्षभर साजरी केली पाहिजे, त्याकरिता जयंती मंडळांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी आणि गणित या विषयासाठी मोफत शिकवणी वर्ग बौद्ध विहारात घ्यावेत, असे आवाहनही मराठी नाऊ फाऊंडेशनचे इंजि. प्रवीण खंदारे, फुले-शाहू-आंबेडकर सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला अध्यक्ष इंजि. प्रवीण खंदारे, डॉ. शुद्धोधन एडके, महेंद्र देमगुंडे, इंजि. दीपक खंदारे यांची उपस्थिती होती.