नांदेड :- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील जागेचा विस्तार करावा आणि या परिसरात संशोधन केंद्र स्थापन करण्यात यावे , पुतळ्याला तातडीने सोनेरी रंग देण्यात यावा या व अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांनी आमरण उपोषणाचा एल्गार पुकारला आहे .
भारत देशातील सनातनी विचाराला गाडून अज्ञानाचा अंधकार दूर करून , ज्ञानाच्या ज्योती घरोघर पेटवणारे , भारतीय समता , स्वातंत्र्य , बंधुता आणि राज्यघटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणे आवश्यक आहे . जागतिक नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महामानवाच्या पुतळा परिसराचा विस्तार करण्याच्या अनुषंगाने या परिसरात असलेली सर्व अतिक्रमण हटविण्यात यावीत . या परिसरातील खाजगी आणि शासकीय जागा महानगरपालिकेने ताब्यात घेऊन एक ऐतिहासिक स्मारक येथे उभा करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा रंग सोनेरी करण्यात यावा.याच परिसरात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका , संशोधन केंद्र स्थापन करावे. ज्यामुळे नांदेडचे नाव जगाच्या इतिहासात नव्याने कोरले जाईल . या संशोधन केंद्रातून शेकडो संशोधक विद्यार्थी जगाच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी तयार होतील . या उदात्त हेतूने महानगरपालिकेने पुढाकार घेऊन तात्काळ भीम जयंती पूर्वी येथे संशोधन केंद्राची स्थापन करण्याचे अनुषंगाने सकारात्मक भूमिका घ्यावी या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राजू सोनसळे हे दिनांक 1 एप्रिल ते 3 एप्रिल या 48 तासाच्या कालावधीत आमरण उपोषण करणार आहेत.
यानुषंगाने त्यांनी महापालिकेचे आयुक्त यांना निवेदन पाठविले आहे. मागणी मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.