नांदेड (प्रतिनिधी)-बुध्दगया महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी देशभरात आंदोलन सुरु असताना आज नांदेड येथे भर उन्हात भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या विराट मोर्चात नांदेड जिल्ह्यातील असंख्य बौध्द बांधव तसेच समविचारी मंडळी सामील झाली होती. बौध्द भिक्खू समितीने या मोर्चाचे आयोजन केले होते.
शहरातील नवा मोंढा मैदानावरून दुपारी 1 वाजता मोर्चाला सुरूवात झाली. बुध्दगया महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी सबंध देशभर आंदोलन सुरु आहे. यासाठी बौध्द भिक्खू महासंघ, भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दल व विविध राजकीय पक्षांचे नेते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी परिश्रम घेत होते. बिहार राज्यातील बुध्दगया महाबोधी महाविहार बौध्द धर्मियांचे पवित्र स्थळ आहे. महाबोधी महाविहार जगाला शांतीचा संदेश आणि समतेचा उपदेश देणाऱ्या तथागत भगवान बुध्दांच्या ज्ञानप्राप्तीचे पवित्र ठिकाण आहे. भारतीयच नव्हे तर जगाच्या पाठीवर असणाऱ्या समस्त बौध्द अनुयायांसाठी महाबोधी महाविहार हे श्रध्देचे स्थळ आहे. देशामध्ये कोणत्याही धर्माचे श्रध्दास्थळ असो त्या त्या ठिकाणी त्या त्या धर्मियांचा ताबा असल्याचे आढळून येते. त्या त्या धर्माच्या अनुसार तेथे पूजा अर्चना, साधना, ध्यानधारणा केली जाते. परंतु महाबोधी महाविहार येथे अन्य मंडळींचा ताबा असल्याने भगवान गौतम बुध्दांच्या विचारांना हारतळा फासण्यात येत आहे. या संदर्भातील टेंम्पल ऍक्ट 1949 हा तात्काळ रद्द करुन महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्यासाठी हा विराट मोर्चा काढण्यात आला. नवामोंढा मैदान भागातून दुपारी एक वाजता हा मोर्चा निघाला. महात्मा फुले पुतळा, शिवाजीनगर, वजिराबाद चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शुभ्रवस्त्र परिधान केलेले अनुयायी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात बौध्द बांधव या मोर्चात शांततेत सहभागी झाले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात द्या आदी घोषणांनी आज शहर दुमदुमून गेले. अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने हा मोर्चा शहरातून निघाला. समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी शिस्तीसाठी यावेळी परिश्रम घेतले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर बौध्द भिक्खू संघ, भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दल तसेच अन्य संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून या मोर्चाची पार्श्वभूमी समजावून सांगितली.
बुध्दगया महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले. तात्काळ याची नोंद प्रशासनाने घेवून संबंधितांना नांदेड जिल्ह्यातील बौध्द बांधवांच्या भावना कळवाव्यात, अशी विनंती यावेळी करण्यात आली. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटनाच्या वतीने पाण्याची व अल्पोपहराची व्यवस्था करण्यात आली होती.