नांदेड(प्रतिनिधी)-कै.डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी जलाशयातून पाईपद्वारे शेतीसाठी पुरवठा होणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन ग्रामीण पॉलीटेकनीक कॉलेजजवळ मागील दहा दिवसांपासून फुटल्या आहेत. दररोज हजारो लिटर पाणी यातून वाहून जात आहे. याकडे कोणीच अधिकारी लक्ष देत नाहीत. जगाला फक्त पाणी वाचवा शिकवण्यातच त्यांना धन्यता वाटते.
विष्णुपूरी जलाशयातून शेतीसाठी पाणी पुरवठा होत असतो. सध्या हा पाणी पुरवठा सुरु आहे. त्यासाठी विष्णुपूरी प्रकल्पापासून निघालेले तीन मोठ-मोठे पाईप विष्णुपूरी येथील ग्रामीण पॉलिटेक्नीक कॉलेजपासून पुढे जातात. वास्तव न्युज लाईव्हला प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणच्या पाईपलाईन पैकी एक पाईपलाईन मागील दहा दिवसांपासून फुटलेली आहे. त्या फुटलेल्या पाईपमधून पाणी उंच फेकले जात आहे आणि खाली पडत आहे. पाण्याचा प्रवाह एवढा जोरदार आहे की, झाडे सुध्दा ओली झाली आहेत. हा प्रकार कोणताही अधिकारी, प्रशासन पाहायला तयार नाही. दररोज हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. एकूण किती पाणी वाया जात आहे. हे मोजण्याचे माप तर वास्तव न्युज लाईव्हकडे नाही. परंतू पाण्याचा प्रवाह पाहता मागील दहा दिवसात लाखो लिटर पाणी वाया गेले असे म्हटले तर चुक ठरणार नाही. प्रशासकीय अधिकारी फक्त जनतेला पाणी वाचवा हे शिकवतात. पण त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारीला मात्र ते नेहमीच झटकतात. त्यातीलच हा एक नमुना आहे. या संदर्भाचा व्हिडीओ सुध्दा वास्तव न्युज लाईव्हला प्राप्त झाला आहे.
विष्णुपूरी प्रकल्पातील लाखो लिटर पाणी मागील दहा दिवसांपासून वाया जात आहे
