४ थे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन; दिगंबर कदम, स्वाती कान्हेगांवकर आणि आ.ग. ढवळे यांचा सहभाग
नांदेड – सुख दुःखाची झालर चढवित कधी धीर गंभीर तर कधी खळाळून हसवणाऱ्या कथांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवले. चौथ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनात सादर झालेल्या कथाकथन या सदरात श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार दिगांबर कदम यांची उपस्थिती होती. तर स्वाती कान्हेगांवकर आणि आ. ग. ढवळे यांनी या सत्रात सहभाग नोंदविला होता. यावेळी स्वागताध्यक्ष प्रविणदादा गायकवाड, निमंत्रक प्रल्हाद हिंगोले, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, उपाध्यक्ष पांडुरंग कोकुलवार, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, कोषाध्यक्ष शंकर गच्चे, राज्यसचिव कैलास धुतराज, महिला विभाग प्रमुख रुपाली वागरे वैद्य, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, सचिव चंद्रकांत कदम आदींची उपस्थिती होती.
येथील सप्तरंगी साहित्य मंडळ आणि प्रज्ञादर्शन शिक्षण संस्था मुदखेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुदखेड येथे रणछोडदास मंगल कार्यालयात चौथे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या कथाकथन या सत्रात सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार दिगांबर कदम यांनी प्रत्येक प्रसंगाला खळाळून हसवत पांगुळ ही अस्सल बोलीभाषेतील कथा सादर केली. स्वाती कान्हेगांवकर यांनी ‘बेड नंबर शून्य’ आणि कथाकार तथा शाहीर आ. ग. ढवळे यांनी ‘फौजी’ अगदी मन हेलावून टाकणाऱ्या कथांचे सादरीकरण केले. उपस्थित श्रोत्यांनी या कथांच्या सादरीकरणाचा मनमुराद आस्वाद घेतला.
कथाकथन सत्राचे सूत्रसंचालन शंकर गच्चे यांनी केले तर आभार नागोराव डोंगरे यांनी मानले. या सत्राच्या यशस्वीतेसाठी सप्तरंगी साहित्य मंडळ आणि प्रज्ञादर्शन शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या सत्रालाही रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.