नांदेड(प्रतिनिधी)-महिला आणि बालिकांचा विनयभंग हा नैतिक अध:पतनाचा प्रकार आहे. त्यामुळे आरोपीला शिक्षा देणे आवश्यक आहे अशी नोंद निकालपत्रात करून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांनी अल्पवयीन बालिकेची छेड काढण्याच्या कारणासाठी आरोपीला दोन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये रोख दंड ठोठावला.सोबतच रोख दंडाची दहा हजार रुपये रोख रक्कम पिडीत बालिकेला देण्याचे आदेश दिले आहेत.
दि.14 नोव्हेंबर 2021 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन बालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा घराजवळ राहणारा युवक सय्यद सजाद सय्यद सलीम (22) हा दुपारी 4 वाजता ती आपल्या नातलगांकडे जात असतांना तिला रोखून मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगून तिची छेड काढली. सोबतच त्यानंतरच्या रात्री 2 वाजता त्याने लाकडांच्या फटांमधून मला आवाज देवून उठवायचा प्रयत्न केला. तेंव्हा माझ्या घरातील सर्वच मंडळी जागी झाली आणि आम्ही सर्व उठल्याचे पाहुन घराची तावदाने फोडून तो पळून गेला. या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 354(डी), 504, 506 तसेच पोक्सो कायद्यातील कलम 8 आणि 12 नुसार गुन्हा क्रमांक 448/2022 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरिक्षक ए.एस.पोवार यांनी केला. न्यायालयात या प्रकरणात विशेष सत्र खटला क्रमांक 4/2022 नुसार हा खटला सुरू झाला. या खटल्यात पिडीत बालिका, तिचा भाऊ, मुख्याध्यापक आणि तपासीक अंमलदार पोवार यांच्या साक्षी झाल्या.
आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांनी या संदर्भाने आरोपी सय्यद सज्जाद सय्यद सलीमला शिक्षेबद्दल काय सांगायचे आहे अशी विचारणा केली. त्याला न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 354(डी) नुसार दोषी जाहीर केले. इतर कलमांमधून त्याची सुटका झाली. या प्रसंगी सय्यद सज्जादचे वकील ऍड. आर.जी. परळकर यांनी कोर्ट उठेपर्यंत शिक्षा द्यावी असे सादरीकरण केले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍड. पी.व्ही. बुलबुले यांनी हा प्रकार नैतिक अध:पतनाचा आहे. म्हणून न्यायालयाच्यावतीने समाजात अशा घटना पुन्हा घडू नये असा संदेश जावा म्हणून जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशी विनंती केली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांनी सय्यद सज्जादला दोन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. दंडाची दहा हजार रुपये रक्कम पिडीत बालिकेला देण्याचे आदेश दिले. पैरवी अधिकारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक माधव मुसळे हे होते.
महिलेची छेड नैतिक अध:पतन; आरोपीला दोन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये रोख दंड
