नांदेड(प्रतिनिधी)-25 ते 30 वयोगटातील चार जणांनी तीन जणांना मारहाण करून एक गाडी बळजबरी चोरून नेली आहे आणि एका गाडीचे नुकसान केले आहे.
जिम ट्रेनर असलेले पुरूषोत्तम दिपक कापरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 जानेवारी रोजी रात्री 11.30 वाजेच्यासुमारास ते आणि त्यांचे मित्र विवेक तराळे आणि शेख युसूफ हे डिलाईट फिटनेस येथे जीमट्रेनरचे काम करून दोन गाड्यांवर घरी परत जात असतांना पीव्हीआर मॉल नवीन कौठा तथा पोलीस उपमहानिरिक्षकांच्या कार्यालयासमोर दोन दुचाकीवर आलेल्या 25 ते 30 वयोगटातील चार जणांनी त्यांना थांबवून शिवीगाळ करण्यास सु रूवात केली. यात झटापट झाली, एकाच्या चेहऱ्यावरील पट्टी निघाली. तेंव्हा त्या सर्वांनी खंजीर काढले. तेंव्हा पुरूषोत्तम कापरे आणि त्यांचे सहकारी मित्र आपल्या दुचाकी गाड्या सोडून पळून गेले. त्यातील विवेक तराळे यांच्या दुचाकी गाडीवर दगडे आपटून तिचे नुकसान केले. तसेच एक दुचाकी 25 हजार रुपये किंमतीची बळजबरीने चोरून नेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 44/2025 नुसार दाखल केला असून पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे हे अधिक तपास करीत आहेत.