नांदेड(प्रतिनिधी)-तामसा टी पॉंईट येथे 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 1 वाजता एका महागड्या चार चाकीत 4 लाख 84 हजारांचा प्रतिबंधीत पान मसाला व गुटखा पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात एकूण 12 लाख 9 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 डिसेंबरच्या रात्रीपासून गस्त करणाऱ्या पोलीसांनी वाहन तपासणी सुरू केली होती. पोलीसांनी एम.एच.38 ए.डी.5206 ही चार चाकी गाडी हदगाव शहरातील तामसा टी पॉईंटजवळ रोखली. तपासणी केली असता त्यात 4 लाख 84 हजार रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा होता. सोबत 7 लाख रुपयांची गाडी 25 हजार रुपयांचे दोन मोबाईल असा 12 लाख 9 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या संदर्भाने मकरम अली खान राशिद अली खान (35) रा.हिंगोली आणि शेख मुजमिल शेख खदीर (33) रा.आझाद कॉलनी हदगाव या दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 393/2024 दाखल केला आहे. या संदर्भाची तक्रार पोलीस अंमलदार भिमराव नरवाडे यांनी दिली आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराव धरणे, सुरज गुरव, भोकर येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक शफाकत आमना यांनी हदगाव येथील पोलीस निरिक्षक राजेश पुरी, पोलीस उपनिरिक्षक राजेश नंद, पोलीस अंमलदार भिमराव नरवाडे, प्रकाश देशमुख, इमरान खान पठाण आणि जेठन पांचाळ यांचे कौतुक केले आहे.
हदगाव पोलीसांनी महागड्या चार चाकी गाडीत 5 लाखांचा गुटखा पकडला
