नांदेड :- ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत शनिवारी (ता.३०) मुक्ताई प्रतिष्ठान, देगलूरतर्फे कुसुम नाट्यगृहात सादर झालेल्या ‘ती रात्र आणि हा दिवस’ या नाटकाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. माणसातील विकृती दूर करून माणूसपण जागवण्याचा संदेश देणाऱ्या या नाटकाने समाजमनाला अंतर्मुख केले.
विना आणि डॉ. रणजित देसाई यांचे सुखी कुटुंब अचानकपणे दरोडेखोर बबन गव्हाणकरच्या आगमनाने हलते. पोलिसांना चुकवत तो डॉक्टरांच्या घरात प्रवेश करतो. गोळी लागल्यामुळे उपचारासाठी डॉक्टरांना धमकावणाऱ्या बबनची खरी ओळख उघड होताच नाटकाला कलाटणी मिळते. पायलच्या अपंगतेचे कारण बबन असल्याचे कळताच डॉ. देसाई संतप्त होतात आणि त्याला ठार मारण्याचा निर्णय घेतात. मात्र, विना देसाई यांची भूमिका महत्त्वाची ठरते. त्या आपल्या पतीला डॉक्टरांचा धर्म वाचवण्याचा असल्याचे पटवून देतात. पुढे बबन गव्हाणकरच्या पश्चातापाची भावना अधोरेखित करत देसाई कुटुंब त्याची मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या या कृतीमुळे बबनच्या मानसिकतेत मोठा बदल होतो. शेवटी तो पोलिसांच्या स्वाधीन होतो, पण त्याच्या मुलीला मिळालेल्या प्रेमामुळे त्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो.या नाट्यमय कथानकाचे सादरीकरण दिग्दर्शक डॉ. मनीष देशपांडे यांनी कौशल्याने केले. लेखक सुहास देशपांडे यांची लेखणी आणि दिग्दर्शकाची परिपक्व हातोटी नाटकाला वेगळी उंची प्रदान करतात. नेपथ्य अविनाश रामगिरवार, प्रकाश योजना अनिल देशपांडे, संगीत गुलाबराव पावडे, वेशभूषा अदिती देशपांडे व मयुरेश विष्णुपुरीकर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. रंगमंच व्यवस्था सौ. सूचिता देशपांडे यांनी यशस्वीपणे सांभाळली. कलाकारांमध्ये राजश्री जोशी, अक्षय भाले, रमेश पतंगे, सुशेन पाटील, अभिज्ञा देशमुख, गुलाबराव पावडे आणि आदिती अग्निहोत्री यांनी आपापल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या. प्रेक्षकांनी या नाटकाला भरभरून दाद दिली. गुलाबी थंडीतही नाट्यगृहात अलोट गर्दी जमली होती, हे विशेष. प्रेक्षकांनी या नाटकाला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी किरण चौधरी व त्यांची टीम परिश्रम घेत आहे.