नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र पोलीस दलातील महिला पोलीसांना गर्भधारणेनंतर 16 आठवड्यांनी कर्तव्यावर असतांना साडी परिधान करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव राजेंद्र भालवणे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्या गणवेशात बदल करण्याबाबत 1998 च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली होती. त्याशासन निर्णयात महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील महिला पोलीसांना गर्भधारणा झाल्यानंतर 16 आठवड्यांनी कर्तव्यावर असतांना साडी परिधान करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. महिलांच्या गर्भधारणा झाल्यापासून पहिला महिना ते 16 आठवड्याचा काळ महिलेसाठी अत्यंत महत्वाचा व कसोटीचा असतो. या काळात जर महिला पोलीसांनी कंबरेवर पट्टा धारण केला तर पोटावर अनावश्यक ताण येवून गर्भपात होण्याची शक्यता असते. यासाठी सर्व पोलीस आयुक्त, सर्व जिल्हा पोलीस अधिक्षक, पोलीस शल्यचिकित्सक, पोलीस रुग्णालय नागपाडा मुंबई यांचा अभिप्राय विचारात घेत पोलीस महासंचालकांनी राज्य पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना गर्भधारणा झाल्यानंतर पहिल्या महिन्यापासून कर्तव्यावर असतांना साडी हा परिधान वापर करण्याची मुभा दिली आहे. यापुर्वीच्या 11 सप्टेंबर 1998 च्या शासन निर्णयातील इतर तरतुदी कायम राहतील. राज्य शासनाच्या गृहविभागाने हा शासन निर्णय संकेतांक क्रमांक 202410091929216629 नुसार संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.