नांदेड -अवयवदान हे श्रेष्ठ दान असून मरणोत्तर देहदानामुळे आपला देह इतरांच्या कामी येतो.तसेच पर्यावरण संवर्धनासाठी ही चळवळ उपयुक्त असून यात नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत देहदान चळवळीचे नांदेड येथील प्रणेते माधव आटकोरे यांनी व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद प्रशाला विष्णुपुरी येथे वेळोवेळी प्रासंगिक अनेकविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.त्याचाच एक भाग म्हणून अवयव दान सप्ताहाच्या औचित्याने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी प्रशालेतील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख राजेश कुलकर्णी यांनी एक प्रेरणा गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले .प्रशालेच्या मुख्याध्यापिका उज्वला जाधव यांनी देहदान याविषयी सविस्तर माहिती दिली .माधवआटकोरे यांनी चालवलेली चळवळ दिशादर्शक असून मी स्वतः देहदानाचा फॉर्म भरून देत आहे अशी घोषणा करून विद्यार्थी पालकांना देहदानाचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही या संकल्पनेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. ए .खदीर यांनी केले .तर आभार शैलजा बोरसे यांनी मानले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद नांदेड च्या शिक्षण विभागाचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. विलास ढवळे, देहदान चळवळीचे प्रणेते ज्येष्ठ पत्रकार माधव आटकोरे ,प्रशालेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव, पर्यवेक्षक शिवाजी वेदपाठक, दिनेश अमीलकंठवार, मारुती काकडे, पंचफुला नाईनवाड, चंद्रकला इदलगावे ,सुनिता सोळंके, पद्माकर देशमुख कृष्णा बिरादार, संतोष देशमुख आदि शिक्षकांसह प्रशालेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.विलास ढवळे यांनी विद्यार्थ्यांसाठी या तंत्रयुगात अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाबरोबर नवीन मार्ग धुंडाळावेत यासाठी जागतिक स्तरावर अनेक नोकऱ्यांची उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी आव्हानात्मक बनले पाहिजे असे सांगितले.