76 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा
नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाड्यामध्ये काही दिवसांपुर्वी निसर्गाने दिलेला त्रास लवकरात लवकर कसा संपविता येईल यासाठी महाराष्ट्र शासन कटीबध्द असल्याचे महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 76 वा वर्धापन दिन. या प्रसंगी मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. त्या अगोदर गिरीश महाजन आणि इतर उपस्थितांनी मुक्ती संग्राम हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहुन आपल्यावतीने मानवंदना दिली. याप्रसंगी अनेक स्वातंत्र्य सैनिक, खा.अशोक चव्हाण, आ.राजेश पवार, माजी आ.राम पाटील रातोळीकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, माजी खा.प्रताप पाटील चिखलीकर, माजी आ.अमरनाथ राजूरकर यांच्यासह प्रशासनामधील जिल्हाधिकारी, अभिजित राऊत, मनपा आयुक्त डॉ.महेश डोईफोडे, पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, मानवी हक्क आयोगाचे पोलीस अधिक्षक योगेशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका यांच्यासह अनेक नेते आणि प्रशासनिक अधिकारी उपस्थित होते. राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे यांच्या नेतृत्वात पोलीस दलाने मानवंदना दिली. पोलीस वाद्यवृंद पथकाने यावेळी राष्ट्रगित आणि महाराष्ट्रगित सादर केले.
याप्रसंगी पुढे बोलतांना गिरीश महाजन म्हणाले मराठवाडा मुक्तीसंग्रामात ज्या हुताम्यांनी आपले बलिदान दिले. त्यांना अभिवादन करत मानवंदना दिली. आणि जनतेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभकामना दिल्या. मराठवाड्यात मागील दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्ठीसाठी मी दोन वेळेस येथे पाहणी करून गेलो. त्याबद्दलची सर्व शासकीय प्रक्रिया सुरू आहे. झालेली नुकसान भरपाई आम्ही विनाविलंब देणार आहोत. या सरकारने नुकसान भरपाई देण्यास कधी वेळ लावला नाही. समस्या कोणतीही असो दे पण ती समस्या तातडीने सोडण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशिल आहे. मागील वर्षीच्या नुकसानीमध्ये फक्त नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना 446 कोटी रुपये नुकसान भरपाई दिल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आज देशभर चर्चेत आहे. महाराष्ट्रात दीड कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. नांदेड जिल्ह्यात 8 लक्ष महिलांना या योजनेचा फायदा देण्यात आला. 3 हजार रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. आर्थिक सुधारणा करण्यात महाराष्ट्राने मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम त्यात सुध्दा विद्यावेतन मिळणार आहे आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्वला योजनेची घोषणा करून दिलेल्या मदतीप्रमाणे प्रत्येक घरातील महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत. महिलांना मुख्यमंत्री मोफत शिक्षण योजनेद्वारे उच्च शिक्षण देण्याची सोय करण्यात आली आहे. 7.5 अश्वशक्ती पंपाना मोफत विज पुरवून शेतकऱ्यांसाठी मदत केली आहे. ज्येष्ठ नागरीकांना विविध योजना जाहीर करून महाराष्ट्र शासनाने आधार दिला आहे. ज्येष्ठांना तिर्थक्षेत्र योजना देवून शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. शासनातर्फे गरीबांना मोफत आरोग्य सुविधा दिल्या जातात. त्याद्वारे सुध्दा अनेक जण लाभान्वित झाले आहे.जिल्ह्यातील विविध पाणी प्रकल्पांना सुधारीत योजनेद्वारे नवीन निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.मराठा आरक्षणासंदर्भात सर्व युवकांना आवाहन करतांना गिरीश महाजन म्हणाले की, शासन त्यासाठी काम करत आहे. युवकांनी संयम राखावा. ग्राम विकास मंत्री म्हणून काम करतांना राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीला स्वतंत्र इमारत देण्यासाठीचे सुरू असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.संत सेवालाल महाराज समृध्द तांडा योजना याद्वारे काम सुरू आहे. महिला सशक्तीकरणावर आमचा भर असल्याने महिला गटांना जास्त प्रभावी करण्यामध्ये शासन काम करत आहे. बचत गटांचे भाग भांडवल आता 15 हजारावरुन 30 हजारांवर करण्यात आले आहे. पंतप्रधान आवास योजनेतून अनेकांना निवारा देण्यात आला. त्यातून ओबीसी बांधव सुटले होते. त्यांनाही आता घरकुले दिले जाणार आहेत. एकात्मिक ग्राम विकासाचे विविध कार्यक्रम एकत्र करून या जिल्ह्याचा विकास करण्यावर माझा भर आहे.
पॅराऑलंपिक स्पर्धेत विजयी झालेल्या भाग्यश्री जाधव, बॅडमेंटनसाठी लताताई उमरेकर, निशाणी बाजीत तेजविरसिंघ जहागिरदार, श्रृष्टी बालाजी जोगदंड, ज्ञानेश बालाजी चेरले, दिपा गवळी, रुतीक बंडेवार, शेख नासेर आदी खेळाडूंना शुभकामना देवून त्यांचा सन्मान केला. अतिवृष्टीमध्ये महसुल विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग पोलीस विभाग यांनी केलेल्या कामासाठी गिरीश महाजन यांनी त्यांचे कौतुक केले.