नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या 24 तासात नांदेड जिल्ह्यात तीन जबरी चोऱ्या दोन चोऱ्या आणि 5 दुचाकी चोऱ्या नोंदविण्यात आल्या आहेत.
दिगंबर शहर जाधव हे दि.4 सप्टेंबरच्या रात्री 9.30 वाजता रेल्वे स्टेशन धर्माबाद येथे उतरले. ते आपला भाचा ज्या रामनगरमध्ये राहतो तिकडे पायी जात असतांना त्यांना अनोळखी लोकांनी सांगितले की, तुम्हाला आंध्रा बसस्थानकाकडे जायचे आहे काय? असे सांगून त्यांना सोबत नेले. रामनगर चौकात तुझ्या पिशवीत काय आहे अशी विचारणा करून बळजबरीने पिशवी काढून घेतली. त्या पिशवीमध्ये आधार कार्ड, प्रसाद, 10 हजार रुपये रोख रक्कम होती. धर्माबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 261 प्रमाणे नोंदवली आहे. पोलीस उपनिरिक्षक पवार ह्या अधिक तपास करीत आहेत.
गणेश विक्रम इंगोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 सप्टेंबरच्या सायंकाळी 6.30 वाजता बाबानगर कुदळा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ते आणि त्यांचे मित्र गटांना दिलेले कर्जावू रक्कमेचे हप्ते वसुल करून परत येत असतांना दुचाकीवर आलेल्या दोन 22 ते 25 वयोगटातील युवकांनी त्यांच्या डोळ्यात मिर्चीची पुड टाकून त्यांच्याकडे असलेली 81 हजार 310 रुपये रक्कमेची बॅग बळजबरीने चोरू नेली आहे. उमरी पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 312/2024 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक केवले अधिक तपास करीत आहेत.
कलमचंद बालचंद दर्डा हे 6 सप्टेंबरच्या पहाटे 4 वाजेच्यासुमारास आपल्या घराकडे जात असतांना वसंतराव नाईक कॉलेजच्या समोरील रस्ता दुभाजकाजवळ 25 ते 30 वयोगटातील तीन युवकांनी त्यांना रोखले आणि त्यांच्याकडील पैसे किंवा काही ऐवज काढून घेण्यासाठी त्यांना डोक्यात खंजीरने मारुन गंभीर दु:खापत केली. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 803/2024 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
सौ.रेखा शिवलिंगराव सवंतकर या 6 सप्टेंबर रोजी वजिराबाद येथील बसस्थानकात देगलूरकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवेश करत असतांना गर्दीचा फायदा घेवून त्यांच्या पर्समधील प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवलेले 4 तोळे सोन्याचे दागिणे ज्यांची किंमत 1 लाख 54 हजार रुपये नमुद आहे. ते चोरुन नेले आहेत. वजिराबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 443/2024 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार गव्हाणकर अधिक तपास करीत आहेत.
अजितसिंह बलवंसिंह लांगरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.6 सप्टेंबर रोजी गुरूद्वारा गेट क्रमांक 5 जवळील स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ते गेले होते. त्यांना बॅंकेत 50 हजार रुपये भरायचे होते. या गडबडीत त्यांच्या 50 हजार पैकी 100 रुपये नोटांच्या दराचे 10 हजार रुपयांचे बंड दोन अज्ञात महिलांनी चोरले आहेत. वजिराबाद पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 444/2024 प्रमाणे दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार कांबळे हे करीत आहेत.
याशिवाय नांदेड जिल्ह्यात शिवाजीनगर, अर्धापूर, इतवारा, धर्माबाद, देगलूर या पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व पाच दुचाकींची किंमत जवळपास 5 लाख रुपये आहे.