नांदेड (प्रतिनिधी)- शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवमहापुराण कथास्थळी पाणीच पाणी साचल्यामुळे शनिवार दि.24 ऑगस्ट रोजीचे कथावाचन रद्द करण्यात आल्यानंतरही मोदी मैदानावर कथा होईल, या आशेने शिवभक्तीत तल्लीन झालेले हजारो भाविक पाण्याची, चिखलाची पर्वा न करता ठाण मांडून बसले होते. काहीही झाले तरी जागा सोडायची नाही या निर्धाराने बसलेल्या भाविकांना अखेर पंडित प्रदीपजी मिश्रा यांनाच व्यायपीठावर येवून मंडप खाली करण्याचे आवाहन करावे लागले. महाआरती करून आजची कथा रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले.
शुक्रवारी रात्री अचानक वादळी-वार्यासह मुसळधार पावसाने नांदेड शहर व परिसराला अक्षरशः झोपडून काढले. शिवमहापुराण कथेचा शुक्रवारचा पहिला दिवस असल्याने भाविकांची अलोट गर्दी पहायला मिळाली. कथेच्या समाप्तीनंतर पावासला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे कथास्थळी सर्वत्र पाणीच पाणी साचले. बाहेर गावाहून आलेल्या भाविकांनी कथामंडपात आश्रय घेतला होता. परंतु मंडपात पाणी साचल्यामुळे भाविकांना अधिक काळ तेथे राहणे असुरक्षित होते. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह स्थानिक प्रशासनाने तत्परता दाखवून भाविकांना इतरत्र हलविण्याची प्रक्रिया सुरु केली. शनिवारी दुपारी कथेची आतुरतेने वाट पाहणार्या भाविकांना पंडितजींनी व्यासपीठावर येवून पाच मिनिटे संबोधित केले. पावसामुळे आजची कथा रद्द झाल्याचे सांगून सर्वांनी ऑनलाईन कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान कथास्थळी पाणी काढण्याचे व मंडप दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले असून प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.