नांदेड(प्रतिनिधी)-प्रसिध्द शिवमहापुराण कथावाचक पंडीत प्रदीपजी मिश्रा यांची दि.23 ते 29 ऑगस्ट दरम्यान कौठा परिसरात शिवपुराण कथा सुरु होणार असून या कथेच्या स्थळाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक व कर्मचारी यांनी भेट देवून आयोजकांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत.
नांदेड येथे उद्यापासून सुरू होणाऱ्या शिवमहापुराण कथेसाठी नांदेड जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागातून भक्तमंडळी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी येणार कोणत्याही भाविक-भक्तांना गैरसोय होवू नये व येणाऱ्या वााहनांचीही पार्किंग मोकळ्या जागेत करण्यात यावी यासाठी दिशादर्शक बोर्ड लावण्यात आले आहेत. व प्रत्येक ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यासह स्वयंसवेकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह या ठिकाणच्या स्वयंसेवकांना योग्य त्या सुचना आणि मार्गदर्शन करत कोणत्याही भाविक-भक्तांना गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे सांगितले. याचेबरोबर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने या ठिकाणी येणाऱ्या भाविक-भक्तांना विनंतीही केली की, कोणत्याही अफवांवर विश्र्वास ठेवू नये. काही गैरवर्तन करत असतांना किंवा संशयीत स्वरुपाच्या वस्तु आढळल्यास जवळील पोलीस कर्मचाऱ्याला व स्वयंसेवकाला याबाबतची माहिती द्यावी अशी विनंती देखील यावेळी करण्यात आली.