नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी आदेश दिले होते. त्यानुसार नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार सहा विशेष पथके तयार करून काम सुरू केले. 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान या सहा पथकांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर एकूण 25 गुन्हे दाखल केले, त्यात 42 आरोपींना अटक करण्यात आली आणि 48 लाख 98 हजार 228 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मागील पाच दिवसांमध्ये नांदेड जिल्ह्यातील अवैध दारुविक्रीविरुध्द 11 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात 14 आरोपींकडून 3 लाख 1 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध रेती वाहतुक करणाऱ्याविरुध्द चार गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्या प्रकरणातील पाच आरोपींकडून 40 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध तंबाखु बाळगणाऱ्या दोन व्यक्तींना पकडून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आणि 30 हजार 431 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार संदर्भाने 5 गुन्हे दाखल करण्यात आले आणि 14 आरोपींकडून 2 लाख 13 हजार 637 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध गुटखा बाळगणाऱ्याविरुध्द दोन गुन्हे दाखल करण्यात आले. चार गुन्हेगारांकडून 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काळ्या बाजारात जाणारा गहु, तांदुळ या संदर्भाने एक गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यातील एका आरोपींकडून 26 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध गॅस वापरणाऱ्या दोन व्यक्तींवर एक गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांच्याकडून 1 लाख 95 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशा प्रकारे पाच दिवसांमध्ये 25 गुन्हे दाखल करून 42 गुन्हेगारांकडून नांदेड पोलीसांनी 48 लाख 98 हजार 228 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कार्यवाही केली आहे.