नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजेंद्रसिंह राजपुत यांच्याविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून त्यांना तुरूंगाची हवा दाखविणाऱ्या कंत्राटदाराविरुध्द प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड करून शासकीय काम चुकीच्या पध्दतीने आपल्याकडे घेण्याच्या कारणासाठी फसवणूक केली म्हणून दादाराव ढगे विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील श्रेणी-1 सहाय्यक अभियंता संतोषकुमार भाऊराव नाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 11.59 वाजेच्यासुमारास निविदा घेण्यासाठी ऑनलाईन भरलेल्या अर्जात मे.ओमकार कंस्ट्रक्शन पिंपळकौठा ता.मुदखेड जि.नांदेडचे मालक दादाराव साहुजी ढगे यांनी जानेवारी 2022 मध्ये मुंदडा ऍन्ड मुंदडा चार्टर्ड अकाऊंटंट या प्रतिष्ठाणातर्फे निर्गमित केलेल्या प्रमाणपत्रावर छेडछाड (टॅम्पर) करून बनावट कागदपत्र तयार केले अणि ते ऑनलाईन भरले. शासनाची दिशाभुल करून ते शासकीय काम स्वत:च्या नावे आबंटीत करून घेवून शासनाची फसवणूक केली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा प्रकार भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 464, 467, 468, 471 प्रमाणे गुन्हा क्रमांक 338/2024 प्रमाणे 20 ऑगस्ट 2024 रोजी दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक जालिंधर तांदळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक अश्रुबा घाटे अधिक तपास करीत आहेत.