नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर येथील अमोल सरोदे यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या ध्वाजारोहण समारंभानंतर करण्यात आला.
आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शासकीय समारंभानंतर अर्धापूर येथील अमोल जयशिला उध्दवराव सरोदे यांना सन 2021-2022 साठीचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या क्रिडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नांदेडद्वारा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या युवक-युवतींच्या नोंदणीकृत संस्थांनी केलेल्या समाज हिताच्या कामाला लक्षात घेवून हा गौरव पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे उद्देश युवकांना प्रोत्साहन मिळावे असे आहे. अर्धापूर येथील अमोल जयशिला उध्दवराव सरोदे यांनी युवक विकासाच्या कार्यामध्ये उत्तम कामगिरी करून समाजातील असंघटतील युवकांना संघटीत करून भरीव योगदान दिले. त्या जिल्हा युवा पुरस्काराचे स्वरुप 10 हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, गौरव पत्र, शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ असे आहे. हा पुरस्कार अमोलने आपली आई जयशिला व वडील उध्दव यांच्या समवेत स्विकारला आहे.
माझा पुरस्कार आई-वडीलांना समर्पित
मला मिळालेला पुरस्कार अजून काम करण्याची प्रेरणा देतो आणि त्यामुळे जबाबदारी वाढते. समाजाला आपल काही तरी देण लागत या भुमिकेतून समाजाच्या सेवेसाठी मी तत्पर राहिल. आज मला मिळालेला पुरस्कार मी माझ्या आई-वडीलांना समर्पित करतो अशी प्रतिक्रिया अमोल सरोदे यांनी दिली.