नांदेड(प्रतिनिधी)-श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याने मागितलेला अटकपुर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही. मराठे यांनही फेटाळून लावला आहे. या प्रकरणात मुळ घोटाळा 26 लाख 11 हजार 66 रुपयांचा होता. त्यातून 18 लाख 27 हजार 500 रुपये घोटाळा करणाऱ्याने भरले होते. या प्रकरणात घोटाळेबाजाच्या पत्नीच्या खात्यावर सुध्दा घोटाळ्याचे पैसे आले होते. पण नांदेड ग्रामीण पोलीसांनी बहुदा महिला आहे म्हणून तिला या प्रकरणात आरोपी केले नाही.
28 मे 2024 रोजी श्री.गुरु गोविंदसिंघजी महाविद्यालयाचे डॉ.संदीप भगवान मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याकडे कंत्राटी पध्दतीवर काम करणारा अविनाश सखाराम टोकलवाड हा महाविद्यालयातील खानावळ व विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाचे कामकाज करण्यासाठी कंत्राटी पध्दतीवर कार्यरत होता. त्याने आपल्या बॅंक खात्यावर आणि पत्नीच्या बॅंक खात्यावर विद्यार्थ्यांकडून फिस स्वरुपात ऑनलाईन पैसे मागवले. तो आकडा मुळात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 7 लाख 83 हजार 566 रुपये होता. परंतू न्यायालयाचा निकाल पाहिल्यानंतर हा घोटाळा 26 लाख 11 हजार 66 रुपयांचा आहे. हा घोटाळा सन 2018 ते 2023 दरम्यान करण्यात आला. घोटाळ्यातील हॉस्टेल बाबतची रक्कम 6 लाख 33 हजार 200 रुपये आहे आणि खानावळीच्या घोटाळ्याची रक्कम 19 लाख 74 हजार 216 रुपये आहेे.
या प्रकरणात अविनाश सखाराम टोकलवाड (30) या विरुध्द नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा क्रमांक 330/2024 दाखल केला. त्यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 420, 406, 467, 468, 471 जोडलेली होती. या घोटाळ्यातील प्राथमिकीप्रमाणे अविनाश टोकलवाडच्या पत्नीच्या बॅंक खात्यावर सुध्दा घोटाळ्याचे पैसे जमा आहेत. पण बहुदा नांदेड ग्रामीण पोलीसांनी ती महिला असल्याने तिचे नाव आरोपी रकाण्यात घेतलेले नाही.
गुन्हा दाखल झाल्यावर दोनच दिवसात इतर फौजदारी अर्ज क्रमांक 412/2024 न्यायालयात दाखल करून अविनाश टोकलवाडने अंतरिम अटकपुर्व जामीन मिळवला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी झाली तेंव्हा टोकलवाडच्यावतीने वकीलांनी सादरीकरण केले होते की, मागील पाच वर्षात या बाबतचे लेखापरिक्षण झाले नाही हे विश्र्वास करण्यासारखी गोष्ट नाही. टोकलवाडवर देखरेख करण्यासाठी डॉ.ए.एस.शिंदे, पी.एन.बलवे, प्रा.पी.पी.जाधव, डॉ.अलोक मिश्रा, डॉ.ए.डी.सावरकर, सहाय्यक वस्तीगृह अधिक्षक जे.पी.रामपुरे, सी.व्ही.नाईक आणि आर.जी.शिंदे एवढे लोक असतांना त्यांनी या प्रकरणाची तपासणी कशी केली नाही हा मुद्दा उपस्थितीत करण्यात आला होता. या उलट सरकार पक्षाच्यावतीने प्रकरणतील 7 लाख 83 हजार 566 रुपये जप्त करणे बाकी आहेत. अद्याप तपास पुर्ण झाला नाही. म्हणून आरोपीला अटकपुर्व जामीन देण्यात येवू नये असे मुद्दे मांडण्यात आले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी लाखोंचा घोटाळा करणारा अविनाश टोकलवाड यास अटकपुर्व जामीन नाकारला आहे.
एका कंत्राटी कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांकडून 26 लाख 11 हजार 66 रुपयांचा घोटाळा झाल्यानंतर महाविद्यालयाचे संचालक आणि त्यांचे पदाधिकारी गप्प का बसले. न्यायालयाच्या कागदांप्रमाणे कंत्राटी कर्मचारी असलेल्या टोकलवाडला फक्त निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर टोकलवाडकडून महाविद्यालयाने 18 लाख 27 हजार 500 रुपये महाविद्यालयाच्या खात्यात भरून घेतले. सहा ते सात डॉक्टर, प्राध्यापक दर्जाचे व्यक्ती टोकलवाडवर देखरेख करण्यासाठी असतांना हा घोटाळा कसा झाला. हा विद्यावाचस्पती पदवी मिळविण्यासाठी खुप छान विषय आहे.