गंभीर जखमी पत्नीला सरपंच व इतर दोघांनी वाचवले
हदगांव (प्रतिनिधी)-हदगांव तालुक्यातील ल्याहारी या गावच्या सिताराम म्हात्रे व ४२ यांने आपल्या ३५ वर्षीय पत्नी सुनीताला जीवे मारण्यासाठी कुराडीने घाव घातले. पत्नी निपचित पडल्यानंतर त्याने स्वतः आपल्या पत्र्याच्या घरातच लाकडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान ल्याहारी येथील नवी आबादी परिसरात मयताच्या राहत्या घरात घडली.
काल आणि आज महिलांचा या वर्षातील पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि शिराळाचा होता. परंतु या सणालाच या घटनेमुळे वेगळा रंग मिळाला. नागपंचमीच्या दिवशी महिला नटून थटून नागराजाची वारुळावर जाऊन पूजा करतात. दिवसभर झोके आणि महिलांचे खेळ खेळतात. आणि आज श्रीयाळ राजाच्या स्मरणार्थ सर्व महिला मातीचे शिराळ बनवून त्या भोवती गाणे म्हणत असतात. अशा या आनंदाच्या दिवशीच माथेफिरू पती सिताराम म्हात्रे याने पत्नीशी वाद घातला, आणि तू का नटलीस म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. हातात कुऱ्हाड घेऊन तीच्यावर सपासप वार केले. या त्याच्या अचानक वारामुळे सुनीता सिताराम म्हात्रे ही बेशुद्ध पडली. ती मेली असे गृहीत धरून त्यांने सुद्धा घरातीलच दोर घेऊन पत्राखालील लाकडाला दोर बांधून गळफास घेतला, आणि आपली जीवन यात्रा संपवली.
या हल्ल्यात सुनिता म्हात्रे वय ३५ ही मेली नव्हती, तर गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध पडली होती. थोड्या वेळानंतर ती शुद्धीवर आल्यावर रांगत रांगत बाहेर गेली. आणि रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना बोलावले. तिची अवस्था पाहून ईतर लोकांसोबतच सरपंच गणेश माधवराव बोईनवाड यांनी पळत जाऊन धीर दिला. पाणी पाजले. शुभम पाडाळकर यांना आपली गाडी घेऊन बोलावले. त्यांचा ड्रायव्हर नसल्यामुळे सरपंच गणेश बोईनवाड यांनी स्वतः गाडी चालवत हदगावला रुग्णालयात नेले. या कामी सरपंच बोईनवाड यांना पोलीस पाटील उमेश सावतकर व ग्रामपंचायत कर्मचारी अविनाश माने यांनी सहकार्य केले. जागरूक नागरिकांच्या समयसूचकतेमुळे त्वरित वैद्यकीय उपचार मिळाले. त्यामुळे सुनीता म्हात्रे ही वाचली. आता तिची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. सदर प्रकरणाची हदगाव पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.