कंधार (प्रतिनिधि )-तालुक्यातील नेहरुनगर येथील माध्यमिक आश्रमशाळेच्या १३ विद्यार्थ्यांना मंगळवारी, ६ जुलै रोजी दुपारी विषबाधा झाली. यातील १३ विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तालुक्यातील नेहरुनगर येथे माध्यमिक आश्रमशाळा आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे एकूण ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांनी मंगळवारी, दुपारी जेवण केले. तसेच पाण्याच्या टाकीतील पाणी पिले. त्यानंतर काही तासाने विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास, छातीत दुखणे, पोटदुखी, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ, उल्टी असा त्रास जाणवू लागला. त्यामुळे शाळा प्रशासनाने तातडीने या विद्यार्थ्यांना कंधार ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तीन विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले.
यावेळी भूमिका राजू राठोड (वय ११, नेहरुनगर), किरणसिंह रावत (वय ११, नेहरुनगर), लता सुरेश चव्हाण (वय १३, नेहरुनगर), स्वप्निली बालाजी मोरे (वय ११, नेहरुनगर), गणेश बालाजी राठोड (वय११, नेहरुनगर), धनश्री नागोराव मोटरगे (वय११,नेहरुनगर), प्रतिक्षा राहुल पवार(वय ८, नेहरुनगर) गिता सुरेश चव्हाण (वय ८,नेहरुनगर), कोमल संग्राम पवार( वय १०, घणातांडा), दिदुबाई संग्राम पवार( वय १३, घणातांडा), आदित्य संग्राम पवार(वय ८, नेहरुनगर), अविनाश अशोक पवार(वय ८, नेहरुनगर), आकाश राजू चव्हाण (वय १०, घंणातांडा) आदी एकूण १३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.
यावेळी विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर वैद्यकीय अधिकारी डॉ.शहाजी कुरे, अपरिचारिका प्रियंका जाधव, शिल्पा केळकर अश्विनी जाभाडे, राहुल गायकवाड, अशिश जाभाडे आदींनी उपचार केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगिता देशमुख, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष सुर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमाकांत बिराजदार, डॉ.योगेश दुलेवाड, डॉ.असमा यांनी माध्यमिक आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. तसेच खिचडी, डाळ व पाण्याचे नमुने तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाला पाठवले.