नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली जिल्हा न्यायालयाने अपील प्रकरणात शिक्षा कायम केल्यानंतर फरार असलेल्या आरोपीला बिलोली पोलीसांनी पकडून त्याला शिक्षा भोगण्यासाठी तुरूंगात पाठविले आहे. या प्रकरणात आरेापीला पाच वर्षाची शिक्षा देण्यात आली होती.
दि.9 जून 2011 रोजी एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 8 जून 2011 च्या रात्री 11 वाजता किरण शिवाजी तुडमे(31) रा.भास्करनगर बिलोली हा गावगुंड हातात लोखंडी कत्ती घेवून घुसला आणि जिवे मारण्याची धमकी देवून घरात बरेच नुकसान केले. शेजारच्या लोकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या घरात सुध्दा तुडमेने घुसून त्यांना मारहाण केली आणि त्यांच्याही घराचे बरेच नुकसान केले. या प्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 59/2011 दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक वाय.एम.शेख यांनी करून किरण शिवाजी तुडमे विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी किरण तुडमेला पाच वर्ष सक्तमजुरी आणि रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात किरण तुडमेने अतिरिक्त सत्र न्यायालय बिलोली येथे अपील दाखल केले होते. या अपील प्रकरणात िलोलीचे तिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.ब.बोहरा यांनी किरण तुडमेची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची शिक्षा कायम ठेवली आणि 20 जून 2024 रोजी त्याच्याविरुध्द पकड वॉरंट जारी केले. किरण तुडमे विरुध्द खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, सरकारी कामात अडथळा, चोरी, गंभीर दुखापत, खंडणी वसुली असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, खंडेराय धरणे, बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरिक्षक दिलीप मुंडे, पोलीस अंमलदार मुद्देमवार, व्यंकट धोंगडे, विजय तुडमे, अक्षय आचेवार यांनी किरण शिवाजी तुडमे (31) यास पकडून त्याला झालेला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा भोगण्यासाठी तुरूंगात पाठविले आहे.