नांदेड(प्रतिनिधी)-हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील लासिन मठ संस्थानची मोक्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणात जागा असून या जागेवर राजकीय व प्रशासकीय मंडळीने अतिक्रमण करून ही जागा हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे व या ठिकाणी अनाधिकृतरित्या बांधकाम करण्याचा घाट घातला गेला आहे. हे बांधकाम तात्काळ थांबवून संबंधीतावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वसमत येथील सर्व्हे नं.140, 141, 142 या गटातील जमीन सव्वाशे वर्षापुर्वी लासिन मठ संस्थान वसमत यांनी शाळेसाठी दिली होती. मात्र या जागेवर आता भुमाफियांच्या सहकाऱ्याने राजकीय आणि प्रशासकीय मंडळींकडून स्वार्थापोटी अतिक्रमण करून प्लॉटींग व व्यवसायीक उपयोगात आणत या जमीनीवर डोळा ठेवला आहे. ही जमीन शहराच्या मध्यभागी असून या जमीनीवर अनेकांनी डोळा ठेवला. विशेषत: करून या ठिकाणच्या राजकीय मंडळीच्या दबावाखाली येवून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या जमीनीच्या कागदपत्रात खाडाखोड करून ताबा मिळिण्याचा प्रयत्न कीत आहेत. पण या जागेवर वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना जोडल्या असून या ठिकाणी त्यांच्या पुर्वजांच्या समाधी आहेत. याबाबत अनेकदा वसमत पोलीस ठाणे व हिंगोली पोलीस अधिक्षक यांच्याकडे लेखी तक्रारी करूनही यांनी याबाबतची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे नांदेड परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी यात विशेष लक्ष घालून या ठिकाणी होत असलेले बांधकाम तात्काळ थांबवून संबंधीतांविरुध्द कडक कार्यवाही करण्यात यावी असे स्वरुपाचे निवेदन वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने देण्यात आले. अन्यथा लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.
या निवेदनावर लासिन मठ संस्थानचे मठाधिपती श्री.करबसय्या गुरु ईश्र्वरअय्या यांची स्वाक्षरी आहे. याचबरोबर यावेळी निवेदन देतांना समाजातील हिंगोली-नांदेड जिल्ह्यातील समाज उपस्थिती होता. यावेळी सतिश देशमुख(भोकर), ऍड.वैभव देशमुख, डॉ.विनायक जिरवनकर, मल्लीकार्जुन नरवाडे, रमेशअप्पा पत्रे, भारतअप्पा महाजन, रविशंकर शिवपुजे, रमेशअप्पा चाकोते, रामअप्पा लकडे, रोहित दरगु, चंद्रशेखर हेरे, जयप्रकाश नाईकवाडे, नागेश दरगु, तुलजेश कटल्यावाले, संगमेश्र्वर बाचे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.