नविन पाच इंटरसेप्टर वाहनांद्वारे रस्ता सुरक्षा विषयी प्रबोधन

रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मदत

नांदेड,(जिमाका)- नांदेड जिल्ह्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नविन 5 इंटरसेप्टर वाहन दाखल झाली आहेत. यामुळे इंटरसेप्टर वाहनांची संख्या आता एकुण 7 झाली आहे. या वाहनामध्ये वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर व हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी स्पीडगन, दारूपिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी ब्रेथ अॅनलायझर, ब्लॅक फिल्म बसविलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी टिंट मीटर इत्यादी अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत. याद्वारे प्रत्येक तालुक्यात ही कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी वाहन चालवितांना रस्ता वाहतुकीच्या नियमांचे व मोटार वाहन कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे. आपले वाहन सुस्थितीत ठेवावे तसेच वाहनांचे कागदपत्रे जसे विमा प्रमाणपत्रे, पीयुसी, योग्यता प्रमाणपत्र, कर पावती इत्यादी अद्यावत ठेवावीत.

 

नांदेड जिल्हयात दळणवळणचा विचार करता रस्त्याद्वारे होणाऱ्या वाहतुकीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. नांदेड जिल्ह्यात दरवर्षी किमान 350 ते 400 नागरिक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. यामध्ये प्रामुख्याने वाहतूक नियमांचे पालन न करणे, हेल्मेट व सिटबेल्टचा वापर न करणे, दारुपिऊन वाहन चालविणे, लेनची शीस्त न पाळणे, वेगमर्यादचे उल्लंघन करणे आदी कारणे दिसून येतात.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारक-चालकांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व वाहनधारक-चालकांनी याची नोंद घेऊन परिवहन विभागास सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *