नांदेड(प्रतिनिधी)-बळेगाव ता.देगलूर येथे 19 एप्रिलच्या रात्री घडलेल्या प्रकारानंतर पोलीसांनी एका व्यक्तीला अटक केली आणि त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभाग तपास करणार आहे अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.
नांदेडच्या देगलूर तालुक्यातील बळेगाव येथे 19 एप्रिलच्या रात्री मरीबा निवृत्ती भुयारे (28) या युवकास गावातील काही लोकांनी पकडून झाडाबा बांधून मारहाण करीत असतांना हा घटनाक्रम पोलीस पाटील बळेगाव यांनी देगलूर पोलीसांना सांगितला. देगलूर पोलीस आले आणि त्यांनी मरीबा निवृत्ती भुयारेला आपल्या ताब्यात घेवून त्याच्या विरुध्द 392 कलमानुसार गुन्हा दाखल केला.त्याचा अटक फॉर्म भरण्यात आला आणि त्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आले असतांना त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर देगलूर पोलीसांनी मरीबा भुयारेचे बंधू हनमंत निवृत्ती भुयारे यंाच्या तक्रारीवरुन गावातील गंगाधर लिंबु भुयारे, अंतेश्र्वर गोविंद भुयारे, गजानन विठ्ठल भुयारे, संतोष विठोबा भुयारे या चार लोकांसह इतरांविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास देगलूरचे पोलीस निरिक्षक व्ही.के.झुंजारे यांच्याकडेच देण्यात आला. 10 जानेवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार पोलीसांच्या ताब्यात असणाऱ्या व्यक्तीच्या जिवीताची जबाबदारी अटक करणारा अधिकारी, तपासी अधिकारी, स्टेशन हाऊस ऑफीसर आणि त्या पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांच्यावर राहिल.
दरम्यान काही दिवसांपुर्वी छत्रपती संभाजीनगर येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील हे नांदेड येथे भेट देण्यासाठी आले होते. 10 जानेवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार मरीबा निवृत्ती भुयारेच्या मृत्यूचा तपास त्यांनी आपल्या विभागाकडे वर्ग करून घेतला आहे. तरी पण देगलूरचे पोलीस निरिक्षक व्हि.के.झुंजारे आजही तेथेच कार्यरत आहेत. त्यांची बदली मात्र अद्याप करण्यात आलेली नाही. सर्वसामान्यपणे असे अपेक्षीत आहे की, अशा प्रकारे मृत्यू झाल्यानंतर त्या पोलीस ठाण्याचा प्रभारी पोलीस निरिक्षक बदलायला हवा.