नांदेड(प्रतिनिधी)-जानेवारी महिन्यात बोधडीजवळ रेल्वे अंडरब्रिजखालून जाणाऱ्या एका सराफ व्यापाऱ्याला रोखून त्याची लुट करणाऱ्या तीन दरोडेखोरांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद करून त्यांच्याकडून चोरी गेलेल्या एकूण ऐवजापैकी 90 टक्के ऐवज जप्त केला आहे. या तीन दरोडेखोरांना तपासासाठी किनवट पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. या पत्रकार परिषदेत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार हे उपस्थित होते.
दि.28 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता बोधडी ता.किनवट येथील दत्ता शहाणे (53) हे सोन्या-चांदीचे व्यापारी आपली दुकान बंद करून त्यातील सोने-चांदी आणि रोख रक्कम असा ऐवज एका बॅगमध्ये भरून आपल्या घराकडे जात असतांना त्यांना बोधडी जवळील रेल्वे पुलाखालून जावे लागते. त्या ठिकाणी तिन जणांनी त्यांना घेरले आणि त्यांच्याकडचे सोने, चांदी, रोख रक्कम ठेवलेली 7 लाख 58 हजार 655 रुपये किंमतीची बॅग बळजबरीने चोरून नेली आहे.
या गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या सुचनेनंतर उदय खंडेराय यांनी पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार यांच्या अखत्यारीत एक पथक तयार केले आणि त्यांना बोधडी शोधण्यासाठी सांगितले. या पोलीस पथकाने अनेक दिवस तेथे मुक्काम केल्यानंतर 17 एप्रिल 2024 रोजी त्यांना माहिती मिळाली की, लुटला गेलेला दत्ता शहाणे याचा एक मित्र बाबुराव त्र्यंबक शहाणे हा दत्तावर रागात होता. कारण दत्ताने त्याच्या शेजारीच दुकान टाकली होती. या आधाराला दुवा बनवत पोलीस पथकाने किशोर उर्फ बारक्या ताणाजी सोळंके(25) रा.अकोली ता.उमरखेड जि.यवतमाळ ह.मु.अबादी बोधडी, संतोष शिवाजी मुंडे(32) रा.शिवशंकरनगर गोकुंदा, किनवट, बापूराव त्र्यंबक शहाणे (49) रा.शास्त्रीनगर बोधडी या तिघांना पकडले. बापुराव शहाणेनेच सोळंके आणि मुंडेला दता शहाणेला लुटायला लावले होते. पोलीसांनी या तिघांकडून सोने आणि चांदीचे दागिणे किंमत 6 लाख 23 हजार 15 रुपयांचे तसेच रोख रक्कम 30 हजार असा एकूण 6 लाख 53 हजार 015 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे आदींनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, सुरेश घुगे, मोतीराम पवार, महेश बडगु, मारोती मोरे, गजानन बैनवाड, उदयसिंग राठोड, संजीव जिंकलवाड, मारोती मुंडे, शेख कलीम आदींचे कौतुक केले आहे.
रोज एकाच रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी आपल्या ऐवजाच्या सुरक्षेसाठी पोलीसांची मदत घ्यावी असे आवाहन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. विशेष करून मायक्रो फायनान्सची वसुली करणारे प्रतिनिधी, सोन्या-चांदीचे व्यापारी, बॅंकेत पैसे भरण्यासाठी मोठी रोख रक्कम घेवून जाणारे व्यापारी यांचे प्रतिनिधी या सर्वांसाठी आम्ही सुरक्षा द्यायला तयार आहोत. त्यामुळे का ही मंडळी आमच्याकडे सांगत नाही हा प्रश्न उपस्थित करून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी किंमती ऐवज घेवून एकाच रस्त्याने प्रवास करणाऱ्या लोकांनी या बाबत दक्षता घेत पोलीसांशी संपर्क साधावा. जेणे करून चोरीच्या घटना घडणार नाहीत.
मतदारानो मतदान कराच-श्रीकृष्ण कोकाटे
या पत्रकार परिषदेत सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुक रणधुमाळीबाबत पत्रकारांशी चर्चा करतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील मतदारांना आवाहन केले आहे की, मतदान हा एक मोठा अधिकार जनतेला संविधानाने दिलेला आहे. या अधिकाराचा उपयोग जनतेने, मतदारांनी केला तरच खऱ्या अर्थाने लोकशाही प्रबळ होईल म्हणून येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने आपला हक्क बजवावा आणि सर्वसामान्यपणे दिसणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये नांदेड जिल्ह्याचे नाव सर्वात वर आणावे असे आवाहन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.