लोकसभा मतदानासाठी 26 एप्रिलला सार्वजनिक सुट्टी ; शुक्रवारी बाजार नाही; मोठया संख्येने मतदानाला बाहेर पडण्याचे आवाहन

 

नांदेड- भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमानुसार 16- नांदेड लोकसभा मतदार संघात मतदान दुस-या टप्‍प्यात शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. या निमित्ताने शुक्रवार 26 एप्रिल 2024 या मतदानाच्या दिवशी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहिर केली आहे. या दिवशी असणारे आठवडी बाजार एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या -त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील ही सुट्टी लागू राहील. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, इतर प्रतिष्‍ठान यांनाही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे उपसचिव व सह मुख्‍य निवडणूक अधिकारी म.रा. पारकर यांनी अधिसूचनेद्वारे कळविले आहे.

*सर्व आठवडी बाजार बंद राहणार* 

तर जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी काढलेल्या आदेशानुसार नांदेड जिल्‍ह्यातील जे विधानसभा क्षेत्र नांदेड, हिंगोली व लातूर मतदार संघात येतात त्‍या ठिकाणी मतदानाच्‍या दिवशी येणा-या बाजाराच्‍या तारखांमध्‍ये बदल केला आहे. मतदानाच्‍या दुस-या दिवशी याठिकाणी बाजार भरणार आहे.

 *२६ एप्रिलला बाजार बंद* 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी नांदेड जिल्ह्यातील 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघातील 83-किनवट, 84-हदगाव व 16-नांदेड लोकसभा मतदारसंघातील 85-भोकर, 86-नांदेड उत्तर, 87-नांदेड दक्षिण, 89-नायगाव, 90-देगलूर, 91-मुखेड या 8 विधानसभा मतदारसंघात शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या या दिवशी भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मार्केट ॲड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हदंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.

शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी हदगाव तालुक्यात हदगाव, किनवट तालुक्यात इस्लापूर, माहूर तालुक्यात सिंदखेड, अर्धापूर तालुक्यात अर्धापूर, धर्माबाद तालुक्यात करखेली, कारेगाव फाटा, नायगाव खै. तालुक्यात बरबडा, देगलूर तालुक्यात माळेगाव म., बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहर, आदमपूर, मुखेड तालुक्यात मुक्रामाबाद, जांब बु. तर नांदेड येथील साठे चौक ते आयटीआय रस्ता, शिवाजीनगर ते ज्योती टॉकीज रोड तसेच गोकुळनगर ते रेल्वेस्टेशन या मार्गावर व रोड क्र. 26 येथील आठवडी बाजार बंद राहतील. तर या ठिकाणची आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार 27 एप्रिल 2024 रोजी भरविण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे.

_लोहा क्षेत्रात ७ मे रोजी बाजार बंद_

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी नांदेड जिल्ह्यातील 41-लातूर लोकसभा मतदारसंघातील 88-लोहा या विधानसभा मतदारसंघात मंगळवार 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मार्केट ॲड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हदंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.

मंगळवार 7 मे 2024 रोजी लोहा तालुक्यातील मारतळा, कलंबर व लोहा येथील आठवडी बाजार बंद राहतील. तर या ठिकाणची आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार 8 मे 2024 रोजी भरविण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!