नांदेड(प्रतिनिधी)-आपल्याच कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला 20 हजारांची लाच मागणी करणाऱ्या गुलाब श्रीधरराव मोरे यास विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी 11 एप्रिलपर्यंत वास्तव्यासाठी तुरूंगात पाठविले आहे.
शहरातील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय तथा शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथील एक व्यक्ती सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच्या गटविमाचे पैसे मिळवून देणे आणि रजा रोखीकरणाचे पैसे मिळवून देण्यासाठी रुग्णालयातील गुलाब श्रीधरराव मोरे (51) या वरिष्ठ लिपीकाने 20 हजारांची लाच मागितली.
20 हजारांची लाच मागणी सिध्द झाल्यानंतर 27 मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे लोक, लाच मागणीची तक्रार देणारे फिर्यादी आणि पंच लाचेचे पैसे देण्यासाठी गेले असतांना गुलाब श्रीधरराव मोरे यांनी पैसे स्विकारले नाहीत. पण लाच मागणी सिध्द झाली होती. म्हणून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार त्यांच्याविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 247/2024 दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच गुलाब मोरेला अटक झाली.
28 मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरिक्षक स्वप्नाली धुतराज आणि त्यांच्या सहकारी पोलीसांनी गुलाब श्रीधरराव मोरेला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यावेळी जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी सरकार पक्षातर्फे सादरीकरण केले. तर आरोपी गुलाब मोरेच्यावतीने ऍड.मनिष रामेश्र्वर शर्मा (खांडील) यांच्या सादरीकरणानंतर न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी गुलाब मोरेला आज 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते. आज पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी गुलाब मोरेला पुढील 14 दिवसांसाठी वास्तव्यासाठी तुरूंगात पाठविले आहे. प्राप्त माहितीनुसार आज गुलाब मोरेच्यावतीने जामीन मिळण्यासाठी अर्ज आलेला नव्हता.
संबंधीत बातमी….