20 हजारांची लाच मागणारा वरिष्ठ लिपीक पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्याच विभागातील सेवानिवृत्त व्यक्तीकडून 20 हजार रुपयांची लाच मागणी करणाऱ्या डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वरिष्ठ लिपीकाला विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी दोन दिवस अर्थात 30 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून औषध निर्माता या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या 59 वर्षीय व्यक्तीकडून त्यांच्या गटविम्याचे पैसे आणि रजारोखीकरणाचे पैसे मिळवून दिल्यानंतर त्यांना 20 हजार रुपये बक्षीस म्हणून द्यावे लागतील असे गुलाब श्रीधरराव मोरे (51) या वरिष्ठ लिपीकांनी मागितले. आपल्या कामासाठी तक्रारदाराने होकार दिला. पण त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. काल दि.27 मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकासह तक्रारदार गुलाब श्रीधरराव मोरे यांना पैसे देण्यासाठी गेले असतांना त्यांनी पैसे स्विकारले नाहीत. तरी पण लाचेची मागणी केली. यासाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुलाब श्रीधरराव मोरे विरुध्द गुन्हा क्रमांक 248/2024 दाखल करण्यात आला आणि काल रात्री त्यांनाा अटक करण्यात आली.
आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरिक्षक स्वप्नाली धुतराज, पोलीस अंमलदार प्रकाश मामुलवार, सचिन गायकवाड, बालाजी मेकाले यांनी अटक केलेल्या गुलाब श्रीधरराव मोरेला न्यायालयात हजर केले. जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी आरोपी गुलाब मोरे आणि इतरांची कॉल हिस्ट्री तपासायची आहे. त्यांच्या घराच्या झडतीमध्ये सापडलेल्या डायरीविषयी चौकशी करायची आहे असे मुद्दे मांडले. आरोपी गुलाब मोरेच्यावतीने दुसऱ्या पिडीतील प्रसिध्द विधीज्ञ ऍड. मनिष रामेश्र्वर शर्मा (खांडील) यांनी या प्रकरणात पोलीस कोठडी देण्याची गरज नाही असे सांगितले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी 20 हजारांची लाच मागणी करणारा वरिष्ठ लिपीक गुलाब मोरे (51) यास दोन दिवस अर्थात 30 मार्च 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

One thought on “20 हजारांची लाच मागणारा वरिष्ठ लिपीक पोलीस कोठडीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *