नांदेड(प्रतिनिधी)-सन 2009-10 या कालावधीत प्रचलित नाव लाडपागे समितीच्या निर्णयांचे उल्लंघन करून 9 सफाई कामगारांच्या वारसाना लिपीक पदावर नियुक्ती देण्यात आल्या होत्या. या संदर्भाने महानगरपालिकेतील कर्मचारी सुमेध बनसोडे यांनी याची चौकशी व्हावी म्हणून सुरू केलेला लढा आता 6 वर्षानंतर समाप्त झाला असून जालना येथील औद्योगिक न्यायालयाच्या न्यायाधीश भारती काळे यांनी नियुक्त झालेल्या 9 कर्मचाऱ्यांचा वाद फेटाळून लावला आहे.
सन 2009 मध्ये सफाई कामगारांच्या वारसांना थेट लिपीक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची नावे राजू कचरू करडे, भगवान गंगाराम जोंधळे, अर्चना दत्ता जोंधळे, नितीन झरीबा कांबळे, रेखा पुंडलिकराव गजभारे, साहेबराव विठ्ठल जोंधळे, अर्जून किशनराव वाघमारे, राहुल यादव कांबळे आणि महेश चंद्रमोहन जोंधळे अशी आहेत.
मनपा कामगार युनियनचे पदाधिकारी सुमेश बनसोडे यांनी या घोटाळ्यास सन 2017 मध्ये उघडकीस आणले. पण आपला चेंडू मनपा आयुक्तांनी शासनाकडे फेकून दिला होता. सुमेध बनसोडे यांनी औद्योगिक न्यायालय जालना आणि उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे धाव घेतल्यानंतर 29 ऑक्टोबर 2021 रोजी या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबद्दलचे आदेश शासनाकडे पाठविण्यात आले होते. तेंव्हा नियुक्त करण्यात आलेल्या 9 मनपा कर्मचाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयात तक्रार क्रमांक 60/2021 दाखल केली. परंतू या लढाईत या कर्मचाऱ्यांचा अर्ज ज्यात आमची नियुक्ती बरोबर आहे हा मुद्दा न्यायाधीश भारती काळे यांनी फेटाळून लावला आणि 9 कर्मचाऱ्यांचा अर्ज रद्द केला. आता या 9 लोकांना सफाई कामगार याच पदावर काम करावे लागेल. त्यांना दिलेली लिपीक पदाची नियुक्ती रद्द ठरली आहे.सुमेध बनसोडे यांना या प्रकरणी महानगरपालिकेने वारंवार वेगवेगळ्या कारणांनी त्रास दिला. तरी सुध्दा विजय अखेर सुमेध बनसोडे यांचाच झाला.