नांदेड(प्रतिनिधी)-तंत्रनिकेतनमध्ये प्रथम वर्षातच नापास झालेला एक बालक जम्मू काश्मिर येथे गेला होता. त्याला शोधून आई-वडीलांच्या स्वाधीन करण्याची कामगिरी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील पथकाने पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पुर्ण केली आहे.
पोलीस ठाणे भाग्यनगरच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीने 31 जानेवारी रोजी पोलीस ठाणे भाग्यनगर येथे तक्रार दिली की, त्यांचा 17 वर्षीय अल्पवयीन पुतण्या कोणीतरी पळवून नेला आहे. यानुसार भाग्यनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 363 नुसार गुन्हा क्रमांक 25/2024 दाखल झाला. दोन महिने उलटल्यावर सुध्दा पोलीस ठाणे स्तरावर याप्रकरणाचा निपटारा झाला नाही तेंव्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील पथकाला त्या बालकाच्या मोबाईल लोकेशननुसार जम्मु काश्मिर येथे जाण्याचे आदेश दिले. नांदेडच्या टिमने जम्मू काश्मिर येथे जावून स्थानिक पोलीसांशी संपर्क साधून त्या अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले. या मुलाला आई-वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी ही मोहिम यशस्वी करणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव, पोलीस अंमलदार अच्युत मोरे, सायलु बिरमवार, गणेश जाधव, यशोदा केंद्रे, राजेंद्र सिटीकर यांचे कौतुक केले आहे.