नांदेड(प्रतिनिधी)- मुखेड तालुक्यात बार ऍन्ड रेस्टॉरंटमध्ये 24 हजारांची लाच स्विकारणाऱ्या ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज गजाआड केले आहे. वृत्तलिहिपर्यंत मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एका 41 वर्षीय फिर्यादीने आज दिलेल्या तक्रारीनुसार मौजे सांगवी भादेव ता.मुखेड जि.नांदेड येथील वार्ड क्रमांक 1 मधील दलितवस्तीच्या सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी नालीचे काम मंजुर झाले होते. त्या कामाची किंमत 5 लाख रुपये होती. तक्रारदाराने ते काम केले होते. त्याचे बिल मिळाल्यानंतर ग्रामसेवक कृष्णा तुकाराम रामदिनेवार यांना 5 टक्के रक्कम म्हणजे 25 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. सदरची 5 टक्के रक्कम 25 हजार रुपये ही लाच असल्याची खात्री झाल्यानंतर आणि ती रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने आज 26 फेबु्रवारी रोजी त्या बाबत तक्रार केली.
आजच या लाच मागणीची पडताळणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली. लाच मागणी करणाऱ्या लोकसेवक कृष्णा तुकाराम रामदिनेवार (38) याने लाच घेवून मुखेड-लातुर महामार्गावरील राजेश बार ऍन्ड रेस्टॉरंट येथे येण्यास सांगितले. तेथे पंचासमक्ष 25 हजारांची लाच मागणीची तडजोड झाली. आणि तडजोडीनंतर लाचेचे 24 हजार रुपये ग्रामसेवक कृष्णा रामदिनेवार याने स्विकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला ताब्यात घेतले. वृत्तलिहिपर्यंत या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधिक्षक रमेशकुमार स्वामी, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक जमीर नाईक, पोलीस अंमलदार गजेंद्र मांजरमकर, किरण कनसे, ईश्र्वर जाधव, प्रकाश मामुलवार यांनी ही कार्यवाही पुर्ण केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जमीर नाईक हे करणार आहेत.
लाच सापळ्याची ही माहिती देतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी एजंट नागरीकांचे कोणतेही शासकीय काम करण्याच्या फि व्यतिरिक्त अन्य पैसे अर्थात लाचेची मागणी करत असेल तर त्या संदर्भाने नागरीकांनी तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती देवून भ्रष्टाचार थांबविण्यासाठी मदत करावी. सोबतच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा दुरध्वनी क्रमांक 02462-253512 आणि टोल फ्रि क्रमांक 1064 यावर सुध्दा माहिती देता येईल.